चेंबूर: शाळेच्या बसवर झाड कोसळून मुलं जखमी, एकाचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला.

या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. तर एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विहान श्रीवास्तव असं या मुलाचं नाव आहे.

घटना घडली त्या क्षणी परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरीही एक शाळकरी मुलगा अजूनही बसमध्येच अडकल्याची माहिती आहे. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बसवर कोसळलेले झाड अत्यंत वजनी आणि मोठे असल्यामुळे ते बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने जेसीबी (JCB) मशीन पाचारण करण्यात आली आहे.

जेसीबी आणि अत्याधुनिक कटर्सच्या सहाय्याने बसवर कोसळलेला झाडाचा मोठा भाग कापून बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. बसमध्ये अडकलेल्या शेवटच्या मुलाला लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे बाहेर काढणे हेच सध्या रेस्क्यू टीमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

ही अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडताच प्रशासनाने घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका (Ambulances) पाचारण केल्या आहेत.

बसमधून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व 10 गंभीर जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी जवळच्या पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे. घटनास्थळावरील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस आणि पालिका अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या