मालमत्ता कर थकबाकीदारांच्या ११९ मालमत्ता जप्त, नवी मुंबई पालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

थकबाकीसह मालमत्ताकर भरण्याची नोटीस बजावूनही थकबाकी न भरणा-या 119 थकबाकीदारांच्या मालमत्ता नवी मुंबई महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत.  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 मधील नियम 45 अन्वये सदर जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे.

मालमत्ताकर थकबाकीदाराने त्यांच्या मिळकतीवरील कराची रक्कम वसूलीच्या खर्चासह 21 दिवसाच्या आत महानगरपालिकेकडे जमा केली नाही तर मिळकतीची विक्री करण्यात येईल अशी नोटीस पालिकेच्या मालमत्ताकर विभागाने जारी केली आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याने मालमत्ताकर विषयक बाबींचा नियमित आढावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने घेतला जात आहे. थकबाकीदारांना अभय योजनेची सवलत देऊनही त्याचा लाभ न घेणा-या व त्यानंतरही नोटीशीस प्रतिसाद न देणा-या मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.

मालमत्ताकर थकबाकीदारांना थकबाकीच्या रक्कमेमध्ये 75 टक्के इतकी सवलत देण्याची अभय योजना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. या दोन महिन्यांच्या कालावधीतही अभय योजनेला प्रतिसाद न देणा-या मोठ्या रक्कमेच्या मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटीस बजावून संधी देण्यात आली होती. तथापि या नोटीशीचा कालावधी संपूनही नोटीशीला प्रतिसाद न देणा-या 119 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागातील 19, नेरुळ विभागातील 20, वाशी विभागातील 34, तुर्भे विभागातील 10, कोपरखैरणे विभागातील 17, घणसोली विभागातील 12 व ऐरोली विभागातील 7 अशा एकूण 119 मालमत्तांचा समावेश आहे.

या 119 मालमत्ताधारकांना रक्कम भरणा करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून या कालावधीतही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांच्या मालमत्तांची विक्री केली जाणार आहे याची सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. ही सूचना नागरिकांच्या माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या