पहिल्या स्थायी समितीत पीठ काढले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीतच भाजपा, काँग्रेससह सपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाचे पीठ पाडले. पहिल्याच बैठकीत नालेसफाई, भंडारदरा जलाशयातील झडपा बदलणे आणि 11 रुग्णालयांमध्ये पीठ आणि तांदूळ पुरवठा करण्याचा प्रस्तावावरून अक्षरशः कीस काढत प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला.

मुंबईच्या नव्या महापालिकेची पहिली स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत महापालिका रुग्णालय आणि प्रसूतीगृहांमधील रुग्णांना जेवण पुरवण्यासाठी खरेदी करण्यात येणारे तांदूळ आणि गव्हाचे पीठ यांच्या खरेदीवरूनच सदस्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी रुग्णालयांसाठी तांदूळ आणि पीठ यांच्या खरेदीसाठी सुमारे 78 कोटी रुपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही. त्यामुळे जेवणाचा दर्जा चांगला ठेवला जावा आणि याच्या तपासणीसाठी परीक्षक नेमला जावा अशी मागणी केली. याला शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी यावर कोणत्या प्रकरचे तांदूळ आणि कोणते पीठ आणले जाणार याची माहिती दिली जावी अशी मागणी केली. परंतु प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांना कोणता तांदूळ आणि गहू याची माहिती देता आली नाही. खरेदी करण्यात येणारा तांदूळ सुपर फाईन लॉन्ग राईस असावा अशी अट असल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना बासमती तांदूळ देणे अपेक्षित असताना तो तांदूळ पुरवठा केला जात नाही. त्यामुळे रवीराजा यांनी हा प्रस्ताव परत पाठवून देण्याची मागणी करत एकदा रुग्णालयातील जेवण आयुक्तांनी जेवून दाखवावे असे आव्हानही रवी राजा यांनी प्रशासनला दिले. याला भाजपाचे मनोज कोटक, सपाचे गटनेते रईस यांनी पाठिंबा देत हा प्रस्ताव परत पाठवून देण्याची मागणी केली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे पाठवून दिला.

याबरोबर नालेसफाईच्या कामाच्या प्रस्तावावरही भाजपाचे मनोज कोटक आणि प्रभाकर शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. ज्याठिकाणी गाळ टाकण्यात आला आहे त्याची पाहणी करण्यात यावी अशी मागणी केली. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई करणाऱ्या प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यांना पाहणी करण्याची मागणी भाजपाने मान्य करून घेतली. भंडारदारा जलाशयाच्या झडपा बदलण्यावरून सभागृनेते यशवंत जाधव आणि भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरत त्यांची भंबेरीच उडवून दिली. त्यामुळे पहिल्याच सभेत सदस्यांच्या प्रश्नांनी प्रशासनाचे पीठ निघाले.

स्थायी समितीत संगीत खुर्ची

स्थायी समितीच्या सभेत भाजपाच्या सदस्यांनी पहिल्या खुर्च्या पकडल्या होत्या. या वेळी मात्र पहिल्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी पुढील खुर्च्या अडवत बसून घेतले. पण त्यानंतर भाजपाचे गटनेते मनोज कोटक हे सदस्यांसह सभागृहात आले. पण सेनेच्या सदस्यांना पूढे पाहून कोटक आपल्या नगरसेवकांना घेऊन मागील खुर्चीत जाऊन बसले. 

त्यानंतर सभागृह नेते यशवंत जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना पुढील खुर्चीवर येऊन बसण्याची विनंती केली. पण कोटक येण्यास तयार नसल्यामुळे अखेर या दोघांनी प्रचंड आग्रह केल्यावर कोटक पुढे बसण्यास आले. त्यांच्याशेजारी प्रभाकर शिंदे, विद्यार्थी सिंह, शैलजा गिरकर, राजुल पटेल, अलका केरकर अशाप्रकारे सेना आणि भाजपाच्या सदस्यांना ज्येष्ठतेनुसार बसवण्यात आले. त्यामुळे या अासन व्यवस्थेमुळे सदस्यांची संगीत खुर्ची पाहायला मिळत होती.

पुढील बातमी
इतर बातम्या