चर्चगेटमध्ये बी-2 मेट्रो स्टेशन, मॅकडोनाल्ड्स आणि केळण भवनसमोरील परिसरात दुपारी मोठं झाड कोसळलं. या झाडाखाली तब्बल चार वाहनं अडकली, तर प्राथमिक माहितीनुसार दोन जण जखमी झाले आहेत.
दुपारी 12.36 वाजता BMCच्या सीपी कंट्रोलला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, चर्चगेटमधील आयकर विभागाच्या मुख्यालयातही मोठी आग लागली. तळघरातून सुरू झालेली आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अडकलेल्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करण्यात आलं. तळघरात असलेल्या दोन कामगारांची सुटका करण्यात आली आहे.
तर मिरा रोडमध्येही मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मेट्रो लाईन-9च्या मेदेतिया नगर स्थानकाजवळ मिरा-भाईंदर रोडवर FOB परिसरातील ग्रॅनाइटचे काही दगड खाली पडले. यावेळी एक स्कूल व्हॅन थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली. मात्र, मेट्रो अधिकाऱ्यांनी कोणत्याही स्कूल बस किंवा व्हॅनवर थेट दगड पडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत MMRDAने संबंधित कंत्राटदार आणि एजन्सींवर एकूण 12.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये J. Kumar Infraprojects Ltd. ला 10 कोटी, Gajananला 1.5 कोटी आणि Systra-CEG-General Consultantला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा