'इतके' क्विंटल फळ, भाजीपाल्याची ऑनलाइन विक्री

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनामुळं मुंबईसह राज्यातील अनेक जण बाजारात जाऊन भाजापाला खरेदीसाठी जात नाही आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीनं खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक आपल्या सोसायट्यांमध्ये भाजीपाल्याचे ट्रक मागवत आहेत. सोसायट्यांमध्ये २ हजार ९८६ शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून दररोज सुमारे २० हजार क्विंटल फळे आणि भाजीपाल्याची थेट व ऑनलाइन विक्री होत आहे.

विक्रीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये २ हजार ८३० थेट विक्रीची ठिकाणं निश्चित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाला बाजारपेठ मिळावी व टाळेबंदीच्या काळात घरपोच भाजीपाला, फळे मिळावीत यासाठी कृषी विभागानं पुढाकार घेऊन ही व्यवस्था केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या, आठवडे बाजार आदी प्रचलित मूल्य साखळीच्या माध्यमातून होणारा शेतमाल पुरवठा वाहतूकदार, हमाल यांच्या उपलब्धतेअभावी विस्कळीत झाला होता. त्यामुळे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था, आत्मा गट, स्वयंसहाय्यता गट, व्यक्तीगट उत्पादक यांच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोचण्याची व्यवस्था करण्यात आली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं निश्चित केलेल्या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीद्वारे शेतीमालाची विक्री करण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार यांच्या समन्वयातून विक्रीसाठी स्थळे आणि पुरवठादार संस्था निश्चित केल्या. 

पुढील बातमी
इतर बातम्या