ठाण्यातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दुरूस्तीच्या कामामुळे ठाण्यातील काही भागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भातसा नदीच्या पात्रावरील पिसे जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाच्या मुखाशी गाळ आणि कचरा अडकला आहे. तो काढण्याचं काम पालिका हाती घेणार आहे. त्यामुळे  महापालिकेच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. 

अतिवृष्टीमुळे नदी पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी कचरा आणि गाळ अडकला आहे. यामुळे पुरेसे पाणी उचलणे पालिकेलाशक्य होत नाही. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ठाणे शहरात कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गाळ आणि कचरा काढण्याचे काम हाती घेतलं आहे. बुधवारी सकाळपासून या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे  बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते गुरुवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतपाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने स्टेम प्राधिकरणाकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याचे विभागवार १२ तासांचे नियोजन केले आहे. यानुसार बुधवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागांत स्टेमचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

बुधवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ या वेळेत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वार, जेल टाकी परिसर, जॉन्सन परिसर, इंटरनिटी परिसर, समतानगर आणि मुंब्य्राच्या काही भागांत स्टेमचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या