२६/११ हल्ल्याच्या ९ वर्षांनंतर भारतात येणार मोशे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बचावलेला बेबी मोशे होल्त्जबर्ग तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार आहे. मोशे ११ वर्षांचा असून दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्याचं वय अवघं २ वर्षे होतं. मोशे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत नरिमन हाऊसला भेट देणार आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी पत्नी सारा आणि १३० सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळासोबत ६ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ मोशे देखील सोमवारी भारतात दाखल होणार आहे. मोशेचं जन्मस्थळ भारतच आहे. ज्या ठिकाणी मोशेने आपल्या आईवडिलांना गमावलं ते ठिकाण मोशेला पाहायचं आहे. गेल्या वर्षी ५ जुलै २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेरूसेलेमला गेले असता भावूक झालेल्या मोशेने मुंबईत येऊन नरिमन हाऊसला भेट देण्याची इच्छा मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती.

नरिमन हाऊसला स्मारकाचा दर्जा

कुलाब्यातील नरिमन हाऊसला छाबड लुबाविच केंद्र नावानंही ओळखलं जातं. मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला टार्गेट करण्यात आलं होतं. या हल्ल्यात केंद्राचे संचालक यहुदी दाम्पत्य रब्बी गेव्रिएल आणि रिविका होल्त्जबर्ग यांच्यासोबत अन्य ६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ नरिमन हाऊसचं रुपांतर आता स्मारकात करण्यात येणार आहे. नेतन्याहू यांच्या उपस्थितीत स्मारकाची औपचारीक घोषणा करण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या