राज्यातील महेश ट्युटोरियल्सच्या 33 शाखांना कुलूप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महेश ट्युटोरियल्स (एम. टी. एज्युकेअर) या प्रसिद्ध कोचिंग संस्थेने कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील (maharashtra) तब्बल 33 शाखांचे कामकाज अचानक बंद केल्याने हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश ट्युटोरियल्सची (mahesh tutorials) मूळ कंपनी एम. टी. एज्युकेअर लिमिटेड ही गेल्या काही वर्षांपासून गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचेही समोर आले आहे.

हे ट्युटोरियल्स 16 डिसेंबर 2022 पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कॉर्पोरेट दिवाळखोरी (bankrupt) निवारण प्रक्रियेत आहे.

30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीच्या आर्थिक निकालांवरील स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या अहवालात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.

या ट्युटोरियल्समध्ये 800 हून अधिक विद्यार्थी शिकत असून, त्यांनी संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी आधीच भरली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन पालकांनी आता राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

महेश ट्युटोरियल्स 38 वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, नुकत्याच त्यांच्या अनेक शाखा (branch) अचानक बंद करण्यात आल्या.

7 जुलै 2026 रोजी सर्व शाखाप्रमुखांची एक तातडीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर, व्यवस्थापनाने 10 जुलैपासून राज्यातील सर्व शाखांमधील कामकाज त्वरित थांबवण्याचा निर्णय जाहीर केला.

यापूर्वी, संस्थेने पालकांकडून 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण प्रवेश शुल्क (फी) वसूल केले होते.

पालकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था करण्यात आली नाही, तसेच फी परताव्याबाबतही स्पष्ट घोषणा केली नाही. परिणामी, हजारो कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

बँका, वित्तीय संस्था, कर्मचारी, वैधानिक प्राधिकरणे आणि इतर कर्जदारांचे दावे अद्याप अंतिम न झाल्याने कंपनीची प्रत्यक्ष देणी किती आहेत, याचे स्पष्ट चित्र उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद आहे.

कंपनीवर सुमारे 74.29 कोटी रुपयांची थकीत कर्जे आणि येणी असून, वाढलेले तोटे, नकारात्मक निव्वळ संपत्ती आणि चालू मालमत्तेपेक्षा अधिक चालू देणी यामुळे कंपनीचे 'गोइंग कन्सर्न' म्हणून दिवाळखोरी प्रक्रियेच्या अंतिम निकालावर अवलंबून असल्याचे लेखापरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा

ठाणे : बालकूममधील प्रस्तावित Amazon डेटा सेंटरविरोधात आंदोलन तीव्र

तिसरी भाषा इयत्ता पाचवीपासून लागू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या