मुंबईतील 482 अनधिकृत धार्मिक स्थळांवर होणार कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने अंतिम 482 धार्मिक स्थळांची यादी तयार केलेली आहे. 2009 च्या सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची ही यादी तयार करून येत्या नोव्हेंबरपूर्वी या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

मुंबईतील उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने 29 सप्टेंबर 2009 नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याचा कृती कार्यक्रम तयार केला. यानुसार या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत लोकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. लोकांकडून मागवलेल्या हरकती आणि सूचनांनुसार तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यांनुसार सहाय्यक आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीनंतर महापालिकेने तोडण्यात येणाऱ्या 482 अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी निश्चित केली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी 17 नोव्हेंबर 2017 ची मुदत दिली आहे. त्या मुदतीनुसार महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. ज्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत आक्षेप आहे, त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे खुद्द महापालिका आयुक्त हे स्वत: पाहणार असून, यात काही चुकीचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. पुढील एक महिन्याच्या आत या अनुषंगाने कुणाला न्यायालयात काही दाद मागायची असल्यास याबाबतची संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या