महापालिका शाळांमधील मुलींना आता ५ हजारांची मुदतठेव

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या नावावर ठेवण्यात येणाऱ्या मुदतठेवीच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलीच्या नावावर महापालिकेकडून अडीच हजार रुपयांची मुदतठेव ठेवली जायची. परंतु, आता ही रक्कम ५ हजार एवढी करण्यात आली आहे.

आधी भत्ता, नंतर मुदतठेव योजना

महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या वाढवण्यासाठी, तसेच शाळेत दाखल झालेल्या मुलींची संख्या कायम राहून त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन म्हणून प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय सन २००७-०८ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार मुलींचे बँकेत बचत खातेही उघडण्यात आले होते. परंतु, यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असल्याने यामध्ये बदल करून मुदतठेव ठेवण्याची योजना राबवण्यात आली.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना थेट मिळणार रक्कम

सन २०१०-११मध्ये पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलीच्या नावे एक हजार रुपये मुदतठेव ठेवून सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, सातवीत शिकणारी मुलगी अज्ञान असल्यामुळे यात पुन्हा बदल करण्यात आला. त्यानुसार पहिलीपासून शिकत असल्यास तिच्या नावावर अडीच हजार रुपयांची, तर दुसरीपासून शिकत असल्यास २३०० रुपये अशा प्रकारची मुदतठेव रक्कम त्या मुलीच्या नावे ठेवून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या खात्यात व्याजासकट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरु आहे.

आता २.५ हजार नव्हे, ५ हजार मुदतठेव

आता त्यात पुन्हा बदल करून सातवी ऐवजी आठवी इयत्तेत शिकत असलेल्या मुलींना याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सातवी ऐवजी आठवीपर्यंत वर्ग वाढवतानाच सध्या पहिलीत प्रवेश घेताना जी अडीच हजार रुपयांची रक्कम देण्याचा विद्यमान निर्णय होता, त्यातही बदल करून ही रक्कम ५ हजार एवढी करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडून अधिक व्याजाची रक्कम मिळावी यासाठी स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहेत. जेणेकरून मुलींना अधिकाधिक व्याजाच्या रकमेचा लाभ देता येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या