मुंबईसह राज्यभरातल्या 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या हा तसा नियमितपणे होणारा प्रकार. काही ठराविक वर्ष सेवेत गेल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या होतात. मात्र यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी एकाच ठिकाणी 3 वर्षही काम केलेले नाही. 

या यादीमध्ये मुंबईतल्या काही मोठ्या आणि प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाला शिस्त लावणारे आणि मेडिकल स्टोअर्सवर धडक कारवाई करणारे आणि सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांची नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली आहे. तर सध्याचे बेस्टचे जीएम जे. डी. पाटील यांची सहकार आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजकल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे यांची बेस्टचे जीएम म्हणून बदली करण्यात आली आहे. बेस्टसमोर असलेल्या आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्याचं आव्हान सुरेंद्र बागडे यांच्यासमोर असणार आहे.

एसआयसीओएमचे एमडी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांची बदली धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी म्हणून करण्यात आली आहे. तर वलसा नायर सिंग, पीएस, टुरिझम अॅण्ड कल्चर यांना प्रधान सचिव, चौकशी अधिकारी, जीएडी, सिव्हिल एव्हिएशन आणि एक्साईज म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

दरम्यान, या यादीनंतर बदल्यांची दुसरी यादी येणार असल्याचीही चर्चा आहे. ज्यामध्ये मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि पल्लवी दराडे यांची बदली होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या