राज्यात ३.५ वर्षाच्या मुलाला ओमिक्रॉनची लागण, नव्या ७ रुग्णांची नोंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. Coronavirus चा नवा प्रकार किंवा बदललेलं रूप असलेला (Omicron New variant) ओमिक्रॉनचा धोका आता आणखी वाढला आहे. ७ जणांना नव्याने Omicron ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आता महाराष्ट्रात या नव्या विषाणूचे सर्वाधिक १७ रुग्ण झाले आहेत. त्यातच आणखी गंभीर बाब म्हणजे या नव्या ७ रुग्णांमध्ये एक जण अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका लहान मुलांना अधिक असेल, असा इशारा यापूर्वीही काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिला होता.

राज्यात नव्यानं समोर आलेल्या ७ ओमिक्रॉनच्या प्रकरणांमधले ३ रुग्ण मुंबईचे तर ४ पिंपरी चिंचवडचे आहेत. हे सर्व जण परदेशातून प्रवास करून आलेले होते. यापैकी चौघांचं लसीकरण पूर्ण झालेलं होतं. सातपैकी एकानं लशीचा एकच डोस घेतला होता. दुसऱ्यानं अजिबात लस घेतलेली नव्हती. उरलेला रुग्ण साडेतीन वर्षांचा असल्यानं त्याला लस उपलब्ध नाही.

या नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यातल्या कुणाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही, असं सांगण्यात आलं.

जगभरात चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रातही शिरकाव केला आणि आता प्रभाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण दिलासादायक म्हणजे डोंबिवली आणि पुण्यातील एक रुग्ण ओमिक्रॉन मुक्त झाले आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या