महिन्याभरात तब्बल 'इतके' ७०० बालके कोरोनाबाधित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून गेल्या महिनाभरात १० ते १९ वयोगटातील ५३५ आणि १० वर्षांखालील २०० बालके बाधित झाल्याचे आढळले आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून सर्वाधिक ११४० रुग्ण ३० ते ४० वयोगटातील आहेत. गेल्या आठवड्यात बालकांच्या २ संस्थांमध्ये जवळपास ३६ बालके बाधित आढळल्यानंतर बालकांमधील कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा होती. मुंबईत ३० जुलै ते २८ ऑगस्ट या काळात ४२१९ रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. 

२० ते ३०(८७६), ४० ते ५०(७९२), ५० ते ६०(७६४) आणि ६० ते ७०(६८२) या वयोगटात रुग्ण आढळले आहेत. त्या तुलनेत बालकांचे प्रमाण मात्र कमी आहे. १० वर्षांखालील २०२ बालके आणि १० ते १९ वयोगटातील ५३५ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांपैकी बहुतांश बालके ही लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे आहेत. तसेच बालकांमध्ये एकही मृत्यू झाल्याचे आढळलेले नाही.

निर्बंध शिथिल केल्यावर बालकांसह घरातील व्यक्ती घराबाहेर पडू लागल्या आहेत. त्यामुळे गर्दी वाढली आहे. परंतु अजून तरी बालकांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे पालकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपयांचे पालन काटेकोरपणे करावे.

पुढील बातमी
इतर बातम्या