पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली इथे पिकनिकला जाणाऱ्या शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. डोंबिवलीतील बामा म्हात्रे विद्यामंदिरमधील तिसरी ते सातवीचे विद्यार्थी या बसमध्ये होते. एकूण ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक बसमधून प्रवास करत होते.
एकविरा येथून दर्शन आटोपून जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदीराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक फेल झाला. बस झाडाला धडकून अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसने पुढे पाठवण्यात आले आहे.