महापालिकेत नवा पहारेकरी

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीने पहारेकऱ्यांची भमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या या पहारेकरी भूमिकेमुळे शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांची प्रचंड गोची झालेली आहे. पहारेकऱ्यांच्या या जागता पाहऱ्याबरोबरच आणखी एका पहारेकऱ्याची भर आता महापालिकेत पडली आहे. महापालिका सभागृहनेत्यांच्या दालनाबाहेर हा पहारेकरी घुटमळत असतो आणि त्यांच्या अनुपस्थितही तो कार्यालयाबाहेरील खुर्चीवर ठाण मांडून डोळ्यात तेल घालून पहारा देत  असतो. अर्थात हा जागता पहारा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क भटका कुत्रा आहे.

शांतता पसरल्याने...

मुंबई महापालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीत असून या कार्यालयाच्या बाहेर शिपायांना बसण्यासाठी असलेल्या खुर्चीवर शुक्रवारी एक कुत्रा बसलेला होता. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सभागृहनेते हे कार्यालयात न आल्यामुळे त्यांचा कर्मचारीवर्गही कार्यालयाबाहेर फिरकला नाही. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या व्हरांड्यात शांतता पसरल्यामुळे कुत्र्याने खुर्चीचा ताबा घेत तिथे आपले बस्तान  ठोकले.

मांजरापाठोपाठ कुत्रेही

भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईकर हैराण झालेले आहे. मात्र, या भटक्या कुत्र्यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठून सभागृहनेत्यांचे कार्यालयाबाहेरच ठाण मांडले. महापालिका मुख्यालयात आधीच मोठ्या प्रमाणात मांजरांचा वावर आहे. परंत आता मांजरापाठोपाठ भटक्या कुत्र्याचाही वावर पहायला मिळत आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी या कुत्र्यांने शिपायाच्या खुर्चीवरच जावून बसत आपण सेवेशी प्रामाणिक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पावसाळा असल्यामुळे हा कुत्रा सुरक्षित जागेचा शोध घेत याठिकाणापर्यंत पोहोचला असावा,असे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुत्रा आला कशाला?

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याऐवजी पहारेकऱ्यांची भूमिका बजावण्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला पहारेकरी आणि विरोधक या दोघांचा सामना करावा लागत आहे.  पहारेकरी म्हणून भाजपाने वारंवार शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केले जात असताना हा मुका प्राणी सभागृनेत्यांच्या पहाऱ्यासाठी तैनात होऊन मी तुमच्यासोबत आहे असेच ते तो सांगायचा प्रयत्न करत नसेल ना!

पहारेकरी म्हणजे वॉचडॉग

भटक्या कुत्र्यांवर होणाऱ्या कारवाईची कैफियत मांडण्यासाठी तो आला आणि सभागृहनेते नसल्यामुळे त्यांची वाट पाहत त्या खुर्चीवर बसला की काय? अशीच चर्चा त्याठिकाणी रंगली होती. पहारेकऱ्याला इंग्रजीत 'वॉचडॉग' म्हणतात. त्यामुळे जागा पहारा देणारा कुत्राच असतो आणि आमच्या कर्तव्यावर घाला घालण्याचे काम पहारेकऱ्यांनी केले आहे, असेच हा कुत्रा सभागृहनेत्यांच्या दालनाबाहेर सांगायला आला नसेल ना? अशीही चर्चा महापालिकेत रंगली होती.

सभागृहनेतेही अनभिज्ञ

दरम्यान दालनाबाहेर पहारेकऱ्याची भूमिका पार करणाऱ्या कुत्र्याबाबत सभागृहनेतेही अनभिज्ञ आहेत. सभागृहनेत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी मात्र आपल्या याबाबत काहीच नसल्याचे म्हटले आहे. 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या