तुमच्या स्मार्टफोनमधील ‘गुगल वॉलेट’ आता केवळ पेमेंटपुरते मर्यादित न राहता, तुमची डिजिटल ओळख बनणार आहे. गुगल आणि UIDAI यांच्यातील विशेष भागीदारीमुळे आता युजर्स त्यांचे आधार कार्ड थेट गुगल वॉलेटमध्ये सुरक्षितपणे सेव्ह करू शकणार आहेत.
एखाद्या ठिकाणी ओळख पटवण्यासाठी पूर्ण आधार कार्ड दाखवण्याची गरज न पडता केवळ आवश्यक माहिती शेअर करण्याची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या प्रवासातील हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
आपली महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित करून ठेवण्याची ही सुविधा आहे. यासाठी ‘आधार व्हेरिफाईबल क्रिडेंशियल्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती तुमच्या फोनमध्ये ऑफलाइन पद्धतीने साठवली जाते. त्यामुळे इंटरनेटशिवायही तिचा वापर करता येईल.
सध्या पीव्हीआर आयनॉक्स (PVR INOX) आणि भारत मॅट्रिमोनी यांसारख्या काही निवडक प्लॅटफॉर्मवर, अशा प्रकारे आधारद्वारे ओळख पटवण्याची सोय सुरू करण्यात आली आहे.
या सुविधेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘सिलेक्टिव्ह डिस्क्लोजर’ (Selective Disclosure). अनेकदा ओळख पटवण्यासाठी आपल्याला पूर्ण आधार कार्ड दाखवावे लागते. यामध्ये आपला पत्ता किंवा आधार क्रमांक यांसारखी गुप्त माहिती असते.
मात्र, गुगल वॉलेटमुळे आता तुम्ही केवळ हवी तेवढीच माहिती शेअर करू शकता. एखाद्याला केवळ वयाचा पुरावा हवा असल्यास फक्त तेवढीच माहिती समोरच्या व्यक्तीला किंवा ॲपला दिली जाईल. यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहील.
सध्या ‘UIDAI’ ने आपले स्वतंत्र आधार ॲप देखील लाँच केले आहे. त्यामध्येही अशाच प्रकारच्या सुविधा मिळतात. मात्र, गुगल वॉलेटचा वापर करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी ही नवीन सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.विमानतळ, सिनेमा हॉल किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जिथे ओळखपत्राची गरज असते तिथे आता फिजिकल कार्डऐवजी मोबाईलमधील हे डिजिटल कार्ड ग्राहकांसाठी मोठी मदत ठरेल. यामुळे कार्ड हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीतीही उरणार नाही.