आहे त्या स्मारकांची निगा कोण राखणार?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एकीकडे महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 36 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. पण, दुसरीकडे जे स्मारक आधीपासून आहे, त्या स्मारकाचा कुठेतरी अपमान होत असल्याची तक्रार वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष निकोलस अल्मेडा यांनी केली आहे. मार्च महिन्यात मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले पू्र्व परिसरात सरकारच्या वतीने थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी केली गेली.शिवजयंतीसाठी एक मोठं स्टेज उभारण्यात आलं होतं. तसेच शिवजयंती साजरी झाल्यानंतर ते स्टेज तोडण्यातही आलं. पण, तिथला कचरा गेल्या एक महिन्यापासून अजूनही तिथेच आहे. त्यामुळे हा शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची तक्रार निकोलस अल्मेडा यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस साचलेला कचरा (डेब्रिज) लवकरात लवकर साफ करावा अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे सरकारने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. पण, दुसरीकडे तिथे साचलेला कचरा उचलायचा मात्र सरकारला विसर पडला असल्याची प्रतिक्रिया निकोलस अल्मेडा यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली. तसेच फक्त निवडणुकांच्या वेळी राजकारणी शिवाजी महाराजांचा आदर करतात का? असा सवालही या वेळी अल्मेडा यांनी उपस्थित केला.

पुढील बातमी
इतर बातम्या