दोन मार्गिकांवर धावणाऱ्या हार्बर लाईनवर (harbour) एसी लोकल सेवा सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे.
मात्र प्रवाशांसाठी दिलासा ठरण्याऐवजी या सेवेने वेळापत्रकावरच परिणाम झाल्याची तक्रार पुढे येत आहे.
एसी (AC local) आणि नॉन-एसी दोन्ही लोकल गाड्या (mumbai local) वारंवार उशिरा (late) धावत असल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा त्रास वाढला आहे. यामुळे कामावर आणि शाळा-महाविद्यालयांत पोहोचण्यास विलंब होत आहे.
यावर्षी प्रजासत्ताक दिनी हार्बर लाईनवर एसी लोकल सुरू करण्यात आली. या मार्गावर एकूण 14 फेऱ्या सुरू आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रत्येकी एक फेरी ठेवण्यात आली आहे.
मात्र पहिल्याच दिवसापासून काही गाड्या वेळेवर धावत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनीही गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिरा येत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे संपूर्ण हार्बर मार्गिकेवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, एसी डब्यांचे स्वयंचलित दरवाजे पूर्णपणे बंद होण्यासाठी लागणारा वेळ ही मुख्य अडचण ठरत आहे. मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर स्थानकांवर अनेक प्रवासी दरवाज्याजवळ उभे राहत असल्याने दरवाजे व्यवस्थित बंद होत नाहीत.
एसी लोकलची सर्व दरवाजे बंद झाल्याशिवाय गाडी सुटू शकत नाही. त्यामुळे गाड्या नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबतात.
दरवाजा यंत्रणेमधील तांत्रिक बिघाडांमुळेही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, एखादी एसी लोकल उशिरा आली तर तिच्यामागची सामान्य लोकलही उशिरा सुटते आणि हा परिणाम पुढील गाड्यांवरही होतो.
विशेषतः कार्यालयीन वेळेत या विलंबामुळे प्रचंड गर्दी होते. काही प्रवाशांनी एसी फेऱ्या अचानक रद्द केल्याबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. अशा वेळी तिकीट रद्द करण्याचे प्रश्न निर्माण होतात आणि बुकिंग काउंटरवर वादावादी होते.
हार्बर लाईनवरील एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले, "वाद टाळण्यासाठी आता तिकीट देण्यापूर्वी प्रवाशांना एसीने प्रवास करणार आहात ना, याची खात्री करून घेतो."
गर्दीच्या वेळेत ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने हार्बर लाईनवरील वेळेची शिस्त पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
हेही वाचा