पालघर साधू हत्याकांडातील ८९ आरोपींना जामीन मंजूर

File Image
File Image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघरमधील साधू हत्याकांड गडचिंचले झुंडबळी प्रकरणात अटक झालेल्या ८९ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे कोर्टाने याबाबतचे आदेश दिले आहे. या प्रकरणातील ८९ लोकांना १५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील ८९ आरोपींना ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे कोर्टाने याच प्रकरणातील ४७ जणांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणी १९४ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी एकूण २२८ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये १२ आरोपींचे वय १८ वर्षाखालील होते. तर हत्येप्रकरणी ८०८ संशयितांची चौकशी केली गेली. या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात ११ हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासणीत केला आहे.

काय आहे प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती. पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत १०१ जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील ९ आरोपी १८ वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या