'फॅशन स्ट्रीट'वरील परवानाधारक 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्यात आल्यानंतर यासर्वांचे स्टॉल्स हटवण्याची कारवाई हाती घेण्याच्या कारवाईला न्यायालयाच्या स्थगितीने रोख लावली आहे. परवाने रद्द करण्यात आलेल्या यासर्व फेरीवाल्यांनी स्थगिती मिळवल्यामुळे याविरोधात महापालिकेने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु याप्रकरणी आता येत्या शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे त्यानंतरच पुढील कार्यवाहीची रणनिती आखण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
फॅशन स्ट्रीट येथील परवानाधारक 394 फेरीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन करून कपडे बाहेर लटकवून अतिक्रमण केले जात होते. याबाबत महापालिकेने त्यांना समज दिल्यानंतर तसेच त्यांचे स्थळ निरीक्षण केल्यानंतर 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यानंतर यासर्व 49 फेरीवाल्यांना आपले सामान हटवण्यासाठी 24 तासांची नोटीस दिली. याविरोधात या फेरीवाल्यांनी मंगळवारी न्यायालयातून स्थगिती मिळवली. या स्थगिती विरोधात महापालिकेच्या ज्येष्ठ कायदेतज्ज्ञासह बुधवारी न्यायालयात बाजू मांडून फेरीवाल्यांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून घेत येत्या शुक्रवारी पुढील सुनावणी ठेवली असल्याचे महापालिकेच्या ‘ए’विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढील कार्यवाहीची रणनिती आखली जाईल,असे त्यांनी म्हटले आहे.