ओमिक्रॉनसाठी महापालिकेचा कृती आराखडा तयार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाबाधित आणि ऑमिक्रॉनची बाधा झालेल्यां रुग्णांची संख्या मुंबईत वाढू लागली आहे. त्यामुळं नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता महापालिका सतर्क झाली आहे. ऑमिक्रॉनचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी ४० हजार, तर झोपडपट्टीवासीयांसाठी ३० हजार खाटा सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेनं पुन्हा एकदा कृती आराखडा तयार केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्यानं मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यातच ऑमिक्रॉनची बाधा झालेल्यांची संख्याही वाढत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेनं कृती आराखडा तयार केला आहे.

मुंबईत ऑमिक्रॉनची बाधा झालेले रुग्ण सापडत असले तरी त्यांना सौम्य लक्षणं असल्याचं आढळलं आहे. त्यामुळं बाधितांसोबतच लक्षणं नसलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून महापालिका रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी ४० हजार खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाविषयक नियमांचं पालन करणं परिस्थितीमुळं शक्य होत नाही.

हे लक्षात घेता झोपडपट्टीतील करोनाची बाधा झालेले वा ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे आढळणाऱ्यांसाठी ३० हजार खाटा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या