मुंबईतल्या 'या' टपाल कार्यालयात फक्त 'महिला राज'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पाऊल ठेवलं आहे. फक्त पाऊल ठेवलंच नाही तर स्वत:ची एक वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. स्वत:च्या बळावर आज त्या कुठल्याही क्षेत्रात यश संपादित करू शकतात. याचंच उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये दुसरे महिला टपाल कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. माहीम बाजार महिला टपाल कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून इतर देशांप्रमाणे भारतातही महिलांना समान संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

किती महिला कर्मचारी कार्यरत?

माहीम बाजार टपाल कार्यालयात नियमितपणे येणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. जवळजवळ ७० टक्के महिला इथं येतात. महिला एकमेकिंशी निःसंकोचपणे संवाद साधू शकतात, त्यामुळे कामातही सहजता दिसून येते. या उद्देशानं माहीम बाजार टपाल कार्यालयात महिला कर्मचारी तैनात करण्यात आले, असं माहीम बाजार महिला टपाल कार्यालयाचा कर्मचारी वर्ग सांगतो. कार्यालयात एकूण आठ महिला कर्मचारी काम करत आहेत. पोस्टमास्तरांपासून पोस्टमनपर्यंत सर्व पदांवर महिला कर्मचारी कार्यरत आहेत. बचत बँक काऊंटर, बहुउद्देशीय नोंदणी, आरक्षण काऊंटर, आधार केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सर्वच कामे या महिला कर्मचारी पाहतात.

यांच्या हस्ते उद्धाटन

कार्यालयाचे उद्घाटन नवी दिल्ली टपाल विभागाच्या सदस्य अरुंधती घोष यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक कैया अरोरा उपस्थित होत्या.

सर्वात पहिले कार्यालय

फक्त महिला कार्यरत असलेलं हे दुसरं पोस्ट ऑफिस आहे. सर्वात पहिलं पोस्ट ऑफिस मुंबईतील फोर्ट भागात सुरू करण्यात आलं होतं. या पोस्ट ऑफिसमध्ये ५ महिला कार्यरत आहेत. पोस्टमास्तरपासून ते पोस्टमनपर्यंत सर्व कामं महिला जबाबदारीनं पार पाडतात.


हेही वाचा

मुंबईतील घरांच्या किंमती घटल्या, नाइट फ्रँकचा अहवाल

बेस्ट बसही २४ तास सुरू राहणार

पुढील बातमी
इतर बातम्या