ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवर 'एआय' वॉच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे महानगरपालिका (thane municipal corporation) क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये एआय (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल अॅप्लिकेशन आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉट विकसित करण्याच्या प्रस्तावाला महानगरपालिका आयुक्तांनी प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली आहे.

त्यामुळे आता एआय शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर लक्ष ठेवणार आहे. ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

दिवा (diva) परिसरातील बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. इमारतींवरील कारवाईनंतर ठाणे (thane) महापालिकेने भविष्यात शहरात नव्याने होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत.

त्यानुसार, शहरात नवीन बेकायदेशीर बांधकामे सुरू करू नयेत म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बेकायदेशीर बांधकामे (Illegal construction) आढळल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. पण त्याहूनही पुढे जाऊन, बेकायदेशीर बांधकामे थांबवण्यासाठी आता महानगरपालिका एआयची मदत घेणार आहे.

या नवीन प्रणालीद्वारे नागरिकांना बेकायदेशीर बांधकामांबाबत तक्रारी नोंदवणे सोपे होईल आणि तक्रार नोंदवणाऱ्या नागरिकांचे गुगल लोकेशन थेट संबंधित विभागाला पाठवले जाईल.

या प्रक्रियेमुळे कारवाईतील विलंब कमी होईल आणि तक्रारी लवकर सोडवण्यास मदत होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

नागरिकांना मोबाईल अॅप किंवा व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या मदतीने महापालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांबद्दल तक्रारी दाखल करता येतील.

नागरिकांनी दाखल केलेली तक्रार त्यांनी अपलोड केलेल्या गुगल मॅप लोकेशननुसार संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. तक्रारीबाबत अधिकाऱ्यांनी सादर केलेला तपासणी अहवाल आणि कारवाईबाबतची सूचना या प्रणालीद्वारे तयार केली जाईल.


हेही वाचा

सिडको नवीन टाऊनशीपची निर्मिती करणार

आशियातील आनंदी शहरांच्या यादीत मुंबई अव्वल

पुढील बातमी
इतर बातम्या