मुंबईतील हवेचा दर्जा घसरला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवेचा वेगही मंदावला असून, हवेत ‘पीएम २.५’चे (घातक सूक्ष्मकण) प्रमाण वाढले आहे.

कुलाबा इथं मंगळवारी ‘पीएम २.५’चे (२.५ मायक्रोमीटर व्यासाचे अतिसूक्ष्मकण) प्रमाण ३५३ तर ‘पीएम १०’चे (१० मायक्रोमीटर व्यासाचे सूक्ष्मकण) प्रमाण २०४ होते. मालाड येथे हे प्रमाण अनुक्रमे ३२१ आणि १४७ होते. माझगाव येथे ‘पीएम १०’चे प्रमाण मध्यम स्तरावर होते; मात्र ‘पीएम २.५’चे प्रमाण ३३७ वर गेल्याने हवेचा दर्जा ‘अतिशय वाईट’ होता. वांद्रे-कुर्ला संकुल येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण ३१३ तर ‘पीएम १०’चे प्रमाण २६३ होते. या सर्व ठिकाणी आज, बुधवारीही हवा ‘अतिशय वाईट’ दर्जाची असण्याची शक्यता आहे.

मोसमी पाऊस माघारी परतला असला तरी अरबी समुद्रात अधूनमधून निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मुंबईत पावसाळी स्थिती निर्माण होत आहे. थंडीची प्रतीक्षा लांबली आहे. या काळात हवेचा वेग मंदावतो. त्यामुळे स्थानिक प्रदूषण आणि त्याच्या जोडीला परिसरातून येणारे सूक्ष्मकण येथे साचून राहतात.

मुंबईच्या तापमानात मंगळवारी मोठी वाढ दिसून आली. सांताक्रूझ इथं कमाल ३५.७ अंश सेल्सिअस, तर किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाबा इथं सरासरीच्या तुलनेत २ अंशांच्या वाढीसह २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस होते.

पुढील बातमी
इतर बातम्या