महापालिका आयुक्तही 'पारदर्शी' आणि 'वास्तववादी'!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी स्थायी समिती अध्यक्षा रमेश कोरगावकर यांना सादर केला. परंतु या अर्थसंकल्पात आयुक्तांनी जास्तीत जास्त भर हा पारदर्शकता आणि वास्तववादी मुद्यांवर दिला आहे. महापालिकेचा कारभार हा पारदर्शी असावा अशी मागणी भाजपाकडून वारंवार होत असतानाच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आगामी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा अर्थसंकल्प वास्तवदर्शी असावे, अशी मागणी केली होती. या दोन्ही पक्षांच्या मागणीचा मान राखत महापालिका आयुक्तांनी पारदर्शी आणि वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडला आहे.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्प मांडताना तर्कसंगत ‘पारदशी नागरिक-स्नेही अर्थसंकल्प’ तयार करण्याची प्रक्रीया राबवण्यता येत असल्याचे सांगितले. यावर्षीपासून सर्वांना सोपे वाटतील आणि सर्वसामान्य आणि तज्ज्ञ हे दोघे समजू शकतील अशाप्रकारे पारदर्शी नागरिक स्नेही अर्थसंकल्पीय दस्तऐवज तयार करण्यात येत आहे. यामध्ये काटकसरींचे तत्व, पुनरावृत्ती टाळण्याचे तत्व, पारदर्शकतेचे तत्व, जबाबदारीचे तत्व, विकास आराखड्याशी एकात्मतेचे तत्व आदींचा अंतर्भात करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्पीय दस्तऐवज आता तर्कसंगत असून तो फक्त नागरिकांना केवळ सहज समजण्यासारखा आहे, एवढेच नव्हे तर तो पारदर्शक आणि आमची जबाबदारी वाढवणारा आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षीच्या तुलनेत 11 हजार 911 कोटीने कमी झाले आहे.

प्रशासकीय खर्चामध्ये कार्यक्षमता आणणे आणि पायाभूत सुविधांसाठी अधिक प्रभावीपणे यथोचित खर्च करणे या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे. मात्र, नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच तयार करण्यात आलेला हा वास्तवदर्शी अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अनावश्यक खर्चावर कठोर देखरेख आणि आवश्यक त्याठिकाणी दूरदृष्टीकोनातून पुरेसा खर्च करणे या धोरणाचा समावेश केलेला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.


"अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही. अत्यंत वास्तवदर्शी असा हा अर्थ संकल्प आहे. शिवसेनेच्या वचननाम्यातील स्वातंत्र्य संग्रहालय, उद्यानांचा विकास, कचऱ्यावरील प्रक्रीया आदींचा समावेश केलेला आहे. उर्वरीत वचननाम्यांतील बाबींचा समावेश स्थायी समितीच्या मंजुरीच्यावेळी केला जाईल. स्थायी समितीच्या अधिकारात या योजनांचा समावेश केला जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या योजनांचा समावेश आयुक्तांनी केला नाही, असे होत नाही, स्थायी समिती आणि सभागृहातील मंजुरीच्यावेळी या योजनांचा समावेश झालेला पाहायला मिळेल."

-रमेश कोरगावकर, अध्यक्ष, स्थायी समिती


"भाजपाने पारदर्शी कारभाराची मागणी केल्यामुळे महापालिका आयुक्तांनी वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पाचे भाजपाच्यावतीने आम्ही स्वागत करतो. आजवर अर्थसंकल्पाचा आकार वाढवून तो फुगवला जात होतो, हा वाढलेला अर्थसंकल्पाचा फुगा फुटला गेला आहे. त्यामुळे परदशी आणि वास्तवदर्शी अर्थसंकल्पासाठी केलेल्या निधीचा शंभर टक्के वापर करून घेण्याचा प्रयत्न भाजपाचे आम्ही सर्व पारदर्शीचे पहारेकरी करून घेणार आहोत"

-मनोज कोटक, गटनेते, भाजपा


"महापालिका आयुक्तांनी सादर केलेले हा अर्थसंकल्प उदासिन असून मुंबईकरांची दिशाभूल करणारा असा आहे. हा अर्थसंकल्प शिवसेना आणि भाजपाचा आहे. आयुक्तांनी पारदर्शकतेचा मुद्दा उचलून भाजपाला पुरक असाच अर्थसंकल्प बनवला. एकूण अर्थसंकल्प हा 37 हजार कोटींचा होता. तो कमी 11 हजार 991 कोटींएवढा केला. मुंबईकरांना शिवसेना आणि भाजपाने जी स्वप्ने दाखवली होती, त्यातील एकाही योजनेचा समावेश यात करण्यात आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे दोघांनी मिळून मुंबईकरांची फसवणूक केलेली असून भविष्यात चांगले रस्ते बनून खड्डेमुक्त रस्ते बनणार नाही, नाल्यांची सफाई होणार नाही. मुंबईत पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होईल." 

-रवीराजा, गटनेते, काँग्रेस


"महापालिकेचे आजवरचे उदासिन अर्थसंकल्प याला म्हणता येईल. यानिमित्ताने शिवसेना भाजपाची मागील 20 वर्षांचे अपयश आज जाहीर झाले. आजवर हे सत्ताधारी पक्ष अर्थसंकल्प वाढवून आणि फुगवून आणत होते आणि आता तेच हे अर्थसंकल्प कमी करून आणत आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प यापूर्वी कमी होऊ शकला असता. पण तो करण्यात आलेला नाही. त्यामुळे यापूर्वी सादर केलेल्या सर्व अर्थसंकल्पांचा आणि अर्थसंकल्प मांडणाऱ्या आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी आमची राहणार आहे." 

-रईस शेख, गटनेते, सपा

पुढील बातमी
इतर बातम्या