मे महिन्यातच आंब्याची आवक घटली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकांच्या घरात आमरस पुरीचा बेत करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे या दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असते. मात्र यावर्षी ऐन मे महिन्यातच आंब्याची आवक घटली आहे.

बदलत्या हवामानामुळे यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाला असून तो वेळेआधी आटोपत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच आंब्याची आवक कमी झाली आहे. नेहमीच्या तुलनेत आता बाजारात केवळ 50 टक्के आंबा येत आहे.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे कोकणातील हापूस आंब्याचे मुख्य हंगाम आहेत. फेब्रुवारीमध्ये आंब्याची आवक सुरू होते आणि त्यानंतर वाढू लागते. एप्रिल आणि मे महिन्यात हा हंगाम बहरतो. त्यामुळे या कालावधीत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होते. 

हापूस आंबा अगदी 200 ते 300 रुपये डझनापर्यंत उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकांच्या या आंब्यावर उड्या पडतात. याच कालावधीत अक्षय्य तृतीयाही येते. यादिवशी अनेकांच्या घरी आमरस पुरीचा बेत असतो. मात्र या वर्षी याच कालावधीत आंब्याची आवक कमी झाली आहे.

बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक बाजारात झाली. एप्रिलच्या मध्यात तर एक लाख पेट्यांची आवकही झाली. मे महिन्यात बहरणारा कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम यावर्षी एप्रिल महिन्यातच बहरला. मात्र मे महिन्यात देवगडचा आंबा कमी झाला असून काही दिवसांत रत्नागिरीमधूनही हापूस आंबा कमी प्रमाणात येईल, असे चित्र आहे.


हेही वाचा

मुंबईत 11 ते 14 मे या कालावधीत पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा

पुढील बातमी
इतर बातम्या