रस्ते कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने ‘सिमेंट काँक्रिटायझेशन रोड्स इन मुंबई’ हा नवीन डॅशबोर्ड विकसित केला आहे. यातून रस्त्यांची यादी, मॅपिंग, पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, तसेच पुढील कामांचे नियोजन नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. हा डॅशबोर्ड 4 सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.
मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने रस्ते काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईत एकूण 2,121 किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी 771 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
तसेच, 574 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे अंशतः पूर्ण झाली आहेत. सुमारे 776 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. रस्ते काँक्रीटीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 798 किमीपैकी 342 किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, रस्त्यांच्या अपुऱ्या कामांमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना त्रास होऊ लागला आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली.
हेही वाचा