इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील 'अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग' (अमृत) या संस्थेने राज्यव्यापी उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाचा लाभ तरुण, महिला उद्योजक, बचत गट (SHG), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई), शेतकरी उत्पादक गट (FPO) तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांना होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत सहभागी उमेदवारांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे आणि चालविणे, व्यवसाय आराखडा व प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक बाबी समजून घेणे, शासकीय योजनांचा लाभ घेणे, बाजारपेठेचा अभ्यास करणे तसेच व्यवसायाचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. हा उपक्रम भारतीय कंपन्या आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी
अमृतच्या माहितीनुसार, या उपक्रमामुळे ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, हरित ऊर्जा सेवा, ईव्ही तांत्रिक सहाय्य, फ्रँचायझी मॉडेल तसेच ग्रामीण भागातील चार्जिंग हब अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय, ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क संचालन, विद्युत देखभाल, हरित ऊर्जा प्रकल्प, ईव्ही उपकरणांची विक्री आणि तांत्रिक सेवा या क्षेत्रांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळावी यासाठी अमृतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा योजनेचाही लाभ घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अमृत कार्यालय, पुंडलिकनगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा.
तसेच ७३९१०६५४७५ किंवा ९४०३२००६०६ या क्रमांकांवर संपर्क करून अथवा अमृतच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येईल.
हेही वाचा