अमूल दूध महागलं, मंगळवारपासून लागू होणार ‘हे’ नवे दर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमूलनं दुधाच्या दरात वाढ केली आहे. लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

१ मार्चपासून नवे दर लागू होतील. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) या अमूलच्या मालकीच्या कंपनीनुसार, ही वाढ १ मार्चपासून देशभरात लागू करण्यात आली आहे.

या वाढीनंतर मंगळवार, १ मार्चपासून अमूल गोल्डचे ५०० मिली पॅकेट ३० रुपयांना, अमूल ताझा २४ रुपयांना आणि अमूल शक्ती २७ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

अमूलच्या म्हणण्यानुसार उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दरात वाढ करण्यात आली आहे. अमूलचे म्हणणं आहे की, प्रति लिटर २ रुपयांची वाढ केवळ ४ टक्के आहे. जी सरासरी महागाई दरापेक्षा खूपच कमी आहे.

जीसीएमएमएफनं सांगितलं की, उत्पादन खर्चात झालेली वाढ हे भाव वाढण्याचे कारण आहे. कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पॅकेजिंग, वाहतूक आणि जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत वाढ झाल्यानं दुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढलेल्या किमती १ मार्च २०२२ पासून लागू होतील.

गेल्या २ वर्षात अमूलनं दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाचे दर वाढल्यानंतर यावेळी शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात प्रतिकिलो फॅट ३५ ते ४० रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे अमूलकडून सांगण्यात आलं आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) नं एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते.

अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर ही दरवाढ लागू होणार आहे. यामध्ये टी-स्पेशल, सोना, ताझा, शक्ती याशिवाय गाय आणि म्हशीचे दूध इत्यादींचा समावेश आहे. तब्बल ७ महिने २७ दिवसांनी दरात वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हेच किमती वाढण्याचे कारण असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

  • अमूल गोल्ड - ३०
  • अमूल फ्रेश - २४
  • अमूल शक्ती - २७


हेही वाचा

कुर्ल्यात इमारतीचे छत कोसळले, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या