मनीष मार्केटजवळील वाढीव शेड्स तोडून फेरीवाल्यांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील मनीष मार्केट, साबुसिद्दिकी मार्ग आणि मुसाफिर खाना या ठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत महापालिकेने त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे.

पालिकेची कारवाई

मनीष मार्केट, साबुसिद्दीकी मार्ग, मुसाफिर खाना मार्ग इत्यादी परिसरातील सुमारे ७६ अनधिकृत फेरीवाल्यांवर गुरुवारी महापालिकेने कारवाई केली. मनीष मार्केटला जोडून असलेल्या वाढीव बांधकामांवरही महापालिकेनं कारवाई करत या ठिकाणच्या फेरीवाल्यांची मस्ती उतरवली.

या ठिकाणी महापालिकेचा कोणताही अधिकारी कारवाई करण्यास पुढे येत नव्हता. त्याचाच फायदा घेत या फेरीवाल्यांनी दुकानांच्या बाजूला शेड्स बांधून वाढीव बांधकाम करत फेरीचा धंदा सुरू केला होता. अखेर गुरुवारी उपायुक्त सुहास करवंदे आणि ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या पथकाने फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली.

७६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

३४ अनधिकृत स्टॉल्ससह ४२ अनधिकृत शेड्स तोडून सुमारे ७६ अनधिकृत फेरीवाल्यांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली. या कारवाईदरम्यान ४ ट्रक भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आला आहे. यासाठी २५ पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तर, महापालिकेचे सुमारे २२ कामगार-कर्मचारी-अधिकारी देखील या कारवाईसाठी कार्यरत होते.

पुढील बातमी
इतर बातम्या