अंडरग्राउंड वॉकवे द्वारे वरळी, BKC आणि प्रमुख स्थानकांना जोडणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मेट्रो कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL) कडून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले जात आहे. शहरातील प्रमुख ठिकाणे आणि मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी अंडरग्राउंड पादचारी वॉकवे जाळे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

या योजनेनुसार, सुमारे 3 किलोमीटर लांबीचे भूमिगत नेटवर्क तयार करण्यात येणार असून, यामध्ये सबवे आणि व्हेस्टिब्युल्सचा समावेश असेल. हे बोगदे नेहरू प्लॅनेटेरीयम (Nehru Planetarium), वरळी प्रोमेनेड आणि Bandra Kurla Complex (BKC) येथील कार्यालयीन इमारतींना मेट्रो नेटवर्कशी जोडतील.

सायंस सेंटर मेट्रो स्टेशन (Science Center Metro Station) येथून दोन प्रमुख बोगदे प्रस्तावित आहेत. पहिला 500 मीटर लांबीचा बोगदा नेहरू प्लॅनेटेरियमपर्यंत जाणार आहे. दुसरा 1.1 किलोमीटर लांबीचा बोगदा वरळी प्रोमेनेडकडे जाणार असून तो महालक्ष्मी (Mahalaxmi Racecourse) परिसरातून जाणार आहे.

याशिवाय, BKC Metro Station येथून सुमारे 1.4 किलोमीटर लांबीचा आणखी एक बोगदा प्रस्तावित आहे. हा बोगदा डायमंड बोर्सजवळ उभारल्या जाणाऱ्या नव्या रेल्वे टर्मिनलपर्यंत जोडला जाईल. या प्रकल्पासाठी डिझाईन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्ससाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मेट्रो स्थानकांच्या परिसरात प्रवासी वर्दळ लक्षात घेऊन ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) नियम लागू करण्यात येत आहेत. या अंतर्गत, विकसकांना त्यांच्या भूखंडांवर 100 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त एफएसआय (Floor Space Index) मिळू शकतो. त्यासाठी त्यांना रेडी रेकनर दराच्या 50 टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे.

या उपक्रमामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा मार्ग उपलब्ध होईल. तसेच मुंबईतील मेट्रो नेटवर्कचा वापर अधिक वाढण्याची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या