आग विझवण्यासाठी महापालिका रुग्णालयांतील विद्युत पॅनलमध्ये 'ही' यंत्रणा बसवणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिका रुग्णालयांतील विद्युत पॅनलमध्ये स्वयंचलित अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उपनगरातील चार रुग्णालयांत ही यंत्रणा उभारली जाणार आहे.

शॉट सर्कीट आणि इतर कारणांमुळं मुंबईत आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुग्णालयांत आगी लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षभरात रुग्णालयांतील आगीचे हे वाढलेलं प्रमाण लक्षात घेता रुग्णालयात आगीचा भडका उडण्याआधीच आग विझवली जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

कोरोनाकाळात रुग्णालयांतील यंत्रांमध्ये आगी लागून रुग्णांचे जीव गेल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानंतर पालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून स्वयंचलित अग्निरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, घाटकोपर येथील संत मुक्ताबाई आणि विलेपार्ले येथील कुपर आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात ही यंत्रणा बसण्यात येणार आहे.

विद्युत पॅनलमध्ये शॉटसर्किट तसेच इतर कारणांमुळे आगीची ठिणगी पडल्यावर स्वयंचलित पद्धतीने ही अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करणार आहे.

या यंत्रणेमुळे इतरत्र पसरण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. या कामासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आगीनंतर धूर बाहेर जाण्यासाठीही यंत्रणा असल्याने बचावकार्यातही अडथळे येणार नाहीत.

पुढील बातमी
इतर बातम्या