'झटका'ने दिला अश्विनी भिडेंना झटका'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'सेव्ह आरे'साठी एकत्रित आलेल्या संघटनांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना चांगलाच 'झटका' दिला आहे. दोन आठवड्यापासून येणाऱ्या मिस्ड कॉलने त्रस्त झालेल्या भिडे यांनी अखेर या प्रकरणी वांद्र्याच्या बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस तपास सुरू आहे.

यामुळे अश्विनी भिडेंची झोप उडाली

मेट्रो-३ मार्गिकेला आवश्यक असलेल्या कारशेडची उभारणी करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) आरेची जागा देण्यात आली. आरे कॉलनीतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडलगतची ३ हेक्टर जमीन राज्य शासनाने हस्तांतरित केल्याने मेट्रो ३चं कारशेड आरे कॉलनीतच होण्यावर शिक्कामोर्तब झालं. हे काम सुरू करण्याआधी शेकडो झाडे तोडावी लागणार होती. याला 'सेव्ह आरे' या संस्थेचा सुरूवातीपासूनच विरोध होता. या कॅम्पेनसाठी सेव्ह आरे संघटनेने बंगळुरूच्या 'झटका डॉटओआरजी' ची मदत घेतली. या दोन्ही संघटनेने आरे येथील मेट्रो ३ च्या मार्गिकेमध्ये येणाऱ्या झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला. या मेसेजमध्ये मुख्यमंत्री, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे आणि उपनगर तहसीलदार यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला होता. हे संपर्क क्रमांक संबधितांच्या कार्यालयातील टेलिफोनशी कनेक्ट होते.

म्हणून दिली तक्रार

व्हायरल केलेल्या या मेसेजमध्ये अश्विनी भिडे यांच्या फोनवर मिस्ड कॉल देऊन या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे भिडे यांना सतत मिस्ड कॉल आल्याने त्या त्रस्त झाल्या. या प्रकरणी अश्विनी भिडे यांनी वांद्र्याच्या बीकेसी पोलीस ठाण्यात गुरुवारी रितसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या