'तंबाखूमुक्त बेस्ट', 2 हजार कर्मचाऱ्यांनी सोडले व्यसन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'जागतिक तंबाखूविरोधी दिना'निमित्त मंगळवारी वडाळा आगारात रुसान फार्माच्या सहकार्याने 'तंबाखू मुक्त बेस्ट' हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात तंबाखूच्या व्यसनातून मुक्ती मिळवणारे वाहन चालक आणि वाहकांनी प्रबोधनपर फलक हाती घेऊन तंबाखूमुक्तीचा संदेश दिला.

बेस्ट प्रशासनाने कर्मचारी व अधिकाऱ्यांची तंबाखूच्या विळख्यातून सुटका करण्याच्या हेतूने 2014 साली 'तंबाखू मुक्त बेस्ट' हा उपक्रम हाती घेतला. बेस्ट उपक्रमाने रुसान फार्माच्या सहकार्याने 25 आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांना तंबाखू सोडण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यातून सद्यस्थितीत 2 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी तंबाखूचे सेवन सोडले आहे. त्यापैकी 200 कर्मचाऱ्यांचा वडाळा आगार येथे मंगळवारी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जे अधिकारी कामगारांना तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहीत करतात अशा आगारांना गोल्ड, सिल्वर, ब्रांझ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे बेस्ट उप जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी सांगितले.

जनतेला विनाअडथळा वीज पुरवठा आणि प्रभावी वाहतूक सेवा मिळावी याकरिता बेस्टचे 4 हजार 500 कर्मचारी कार्यरत असतात. आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी बेस्ट नेहमीच प्रयत्नशील असते. त्याकरिता बेस्टच्या वैद्यकीय विभागाने 'तंबाखू मुक्त बेस्ट' हा उपक्रम हाती घेतल्याने 2016 सालापर्यंत 500 बेस्ट कर्मचाऱ्यांनी तंबाखूचे व्यसन सोडले. तर 2017 मध्ये 1 हजार 500 या यादीत दाखल झाल्याने हा आकडा 2 हजारांवर गेला आहे. या उपक्रमाबाबत आम्ही समाधानी असून ही जनजागृती अशाच पद्धतीने सुरु राहील.
- डॉ. अनिलकुमार सिंगल, मुख्य वैद्यकीय अधिकारी, बेस्ट

पुढील बातमी
इतर बातम्या