भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा पूर्वपदावर येण्‍यास सुरुवात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍यानं कार्यान्‍व‍ित होत असून मुंबईतील ज्‍या भागांना संध्याकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुरवठा टप्‍प्‍या-टप्‍प्‍यानं सुरु करण्‍यात आला आहे. भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचं पाणी शिरल्यानं जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. या कारणानं मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये रविवारी सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता.

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी (filtration)व उदंचन (pumping)यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्‍यात आली. यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍यानं सुरु करण्‍यात येत आहेत. उदंचन सुरु होताच भांडुप मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir)कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुरवठा देखील करण्‍यात आला आहे.

प्रामुख्‍यानं एच/पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा, के/पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूर्व परिसर, के/पश्चिम विभागातील यारी रोड, पी/उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर, पी/दक्षि‍ण विभागातील बिंबीसार परिसर, आर/दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, आर/उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर यासोबत शहर भागामध्‍ये जी/दक्षि‍ण विभागातील तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान, तसेच जी/उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी, डी विभागात भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, ए विभागात कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍या-टप्‍प्‍यानं पाणीपुरवठा देण्‍यात आला आहे/ देण्‍यात येत आहे.

भांडुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होवून पाणीपुरवठा पूर्वपदावर येतो आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं पुन्‍हा एकदा करण्यात येत आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या