का झाले भेंडीबाजारातील रहिवासी जीवावर उदार?

आठ महिन्यांपूर्वी, ३१ ऑगस्ट २०१७ रोजी भेंडीबाजारमधील हुसैनीवाला इमारत अचानक कोसळली आणि यात ३४ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर भेंडीबाजार पुनर्विकासाची जबाबदारी असणाऱ्या बुऱ्हाणी ट्रस्ट आणि म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळानं येथील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना १०० टक्के यश येताना काही दिसत नसल्याचं चित्र आहे.

स्थलांतरीत होण्यास नकार

भेंडीबाजार इथं अजूनही अंदाजे ४००-५०० रहिवाशी अतिधोकादायक इमारतीत राहत असून या रहिवाशांचं मन वळवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यानंतरही हे रहिवाशी स्थलांतरीत होण्यास नकार देत आहेत. त्यामुळे बुऱ्हाणी ट्रस्टची डोकेदुखी वाढली आहे. कारण आता पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात अतिधोकादायक-धोकादायक इमारती पडण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न बुऱ्हाणी ट्रस्टसमोर पडला आहे.

देशातला सर्वात मोठा समुह पुनर्विकास

भेंडीबाजारमधील १६ एकर जागेवरील २५६ इमारतींचा पुनर्विकास बुऱ्हाणी ट्रस्टकडे म्हाडानं सोपवला आहे. देशातील पहिला सर्वात मोठा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समुह पुनर्विकास असा भेंडीबाजार पुनर्विकासाची ओळख असून हा पुनर्विकास अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. या पुनर्विकासाअतंर्गत ४२२१ रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. ४०० कोटींचा हा प्रकल्प २०१० मध्ये बुऱ्हाणी ट्रस्टकडे सोपवत या पुनर्विकासातील सर्व २५६ इमारतींना म्हाडानं उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारती म्हणून घोषित केलं आहे.

त्यानुसार २०११ मध्ये रहिवाशांना स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा बुऱ्हाणी ट्रस्टला देत म्हाडानं कुर्ला आणि माझगाव येथील १७०० संक्रमण शिबिराचे गाळे ट्रस्टकडे हस्तांतरीत केले होते. बुऱ्हाणी ट्रस्टने रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली खरी. पण कित्येक रहिवाशांनी स्थलांतरीत होण्यास नकार देत अतिधोकादायक इमारतीतच रहाण्याचा निर्णय घेतला. परिणामी आठ महिन्यांपूर्वी हुसैनीवाला इमारत कोसळली आणि त्यात ३४ निष्पांपाचा बळी गेला.

भाड्याची रक्कम दुप्पट तरीही...

या घटनेनंतर मात्र खडबडून जाग आलेल्या दुरूस्ती मंडळानं आणि बुर्हाणी ट्रस्टनं रहिवाशांच्या स्थलांतरीसाठी कंबर कसली. त्यानुसार रहिवाशांना देण्यात येणार्या भाड्याची रक्कम १५ हजारांहून ३० हजार करण्यात आल्याची माहिती बुर्हाणी ट्रस्टच्या प्रवक्त्यांना मुंबई लाइव्हला दिली आहे. तर रहिवाशांना दोन वर्षाचं भाडं एकत्रित देण्यात आल्याचंही प्रवक्त्यानं सांगितलं आहे. रहिवाशांना समजावून सांगितल्यानंतर, भाड्याची रक्कम दुप्पट केल्यानंतरही अजूनही ४००-५०० रहिवाशी स्थलांतरीत होण्यास तयार नसल्याचं चित्र आहे.

रहिवाशांची मनधरणी सुरूच

हे रहिवाशी नकार देत असले तरी बुऱ्हाणी ट्रस्टला मात्र त्यांना कायद्याचा धाक दाखवून, जबरदस्तीनं बाहेर काढावे असं वाटत नाही. त्यामुळे अजूनही रहिवाशांची मनधरणी सुरू असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता या रहिवाशांचं मन वळवण्यासाठी बुऱ्हाणी ट्रस्टनं थेट लहानग्यांची मदत घेतली आहे. रविवारी, १४ मे ला सकाळी साडे नऊ वाजता भेंडीबाजारमधील २०० हून अधिक शालेय मुलं एक लाँग मार्च काढत रहिवाशांना स्थलांतरीत होण्याचं आवाहन करणार आहेत. त्यामुळे या लहानग्याच्या आवाहनानंतर तरी हे रहिवाशी हटतात का हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या