मुख्यमंत्री म्हणतायत, 'मुंबईत तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र बंददरम्यान मुंबई आणि परिसरात तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून मुंबई पोलीस गुन्हे दाखल करणार, दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करणार, रेल्वे पोलीसही गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राजकीय लाभ घेण्यासाठी काही विघातक शक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करतानाच असा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.

संयम बाळगण्याचं आवाहन

हिंदी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ज्या वेळी कोणतेही मुद्दे नसतात त्यावेळी अशा प्रकारे वाद निर्माण केले जातात. शाहू, फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, असं आपण म्हणतो. पण काही लोकांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं.

जातीयवादाला थारा नाही

महाराष्ट्राची जनता जातीयवादाला थारा देणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन केलं. बाहेरील शक्ती राज्यात येऊन जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या शक्तीचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. त्यांना या नाजूक विषयाचा लाभ घेण्यापासून आपणच रोखले पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या जनतेला तणाव नको तर विकास हवा आहे, त्या दृष्टीने नागरिकांनी आचरण करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या