शिवणयंत्र, घरघंटीच नको तर महिलांना रिक्षाही द्या!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

आर्थिक दुर्बल गटातील, निराधार तथा गरीब महिलांना महापालिका घरघंटी, शिवणयंत्र आदी साहित्य देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देते. परंतु आता बदलत्या युगात महिलांनीही रिक्षा, टॅक्सी आणि वाहनं चालवून आपला उदरनिर्वाह चालवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेनं स्वयंरोजगार उपलब्ध करून देताना त्यामध्ये रिक्षाचाही समावेश करावा आणि यासाठी संबंधित महिलेला एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम देऊन रिक्षाचं वाटप करावं, अशी मागणी आता भाजपा नगरसेविका दक्षा पटेल यांनी केली आहे. ही मागणी महापालिका सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली असून पुढील सभांमध्ये यावर निर्णय घेतला जाणार आहे.

ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी

मुंबईतील गरीब महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा याकरता महापालिका जेंडर बजेटच्या माध्यमातून महिला आणि बाल कल्याण योजनेंतर्गत त्यांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण दिलं जातं. स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी महिलांना शिवण यंत्र, घरघंटीचे वाटप करण्यात येतं. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात या साधनांद्वारे मिळणारं उत्पन्न मर्यादित व अपुरं असल्याची मागणी भाजपा नगरसेविका दक्षा पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

ठोस उपाययोजना आवश्यक

कौशल्य विकास चालवण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत महिलांना व्यक्तिगत स्तरावर वाहन चालवण्याचं मोफत प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणाचा स्वयंरोजगाराकरता उचित उपयोग व्हावा, यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजनेतंर्गत वाहन चालवण्याचं प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्या महिलांना रिक्षाच्या किंमतीपैकी ५० टक्के रक्कम त्या स्वत: भरतील आणि उर्वरीत ५० टक्के महापालिका देईल, या अटीसापेक्ष रिक्षाचं वाटप करण्यात यावं. जेणेकरून महिला सक्षमीकरणाचा उद्देश सफल होईल, असं पटेल यांनी म्हटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या