आशिष शेलारांची पुन्हा नाल्यात उडी!

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या नालेसफाईतील गाळाच्या वजन काट्यावरून प्रशासनाला धारेवर धरून यातील भ्रष्टाचाराची मागणी करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा नाल्यात उडी घेतली आहे. शेलार यांनी शुक्रवारी वांद्रे, खार आणि सांताक्रूझ पूर्व भागातील नाल्यांची पाहणी केली आणि काढलेला गाळ कुठे टाकला जातो यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर गाळ टाकल्या जाणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

नालेसफाईची कामे सुरू होताच महापालिकेत पारदर्शी कारभाराचा आग्रह धरलेल्‍या भाजपातर्फे कामांवर लक्ष ठेवण्‍यात येत आहे. शुक्रवारी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी खार, वांद्रे, जुहू येथील गझदरबांध आणि परिसरातील एसएनडीटी, मेन एव्हिन्‍यू, नॉर्थ एव्हिन्‍यू, साऊथ एव्हिन्‍यूसह ग्रिन स्‍ट्रीट नाल्‍याची पाहणी केली. नालेसफाईतील जो गाळ काढला जातो तो खासगी डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्‍यात येतो आहे, ती ग्राउंड नेमकी कुठे आहेत? किती गाळ टाकला जातो? ज्‍या वजन काट्यावर गाळ मोजला जातो तो नेमका कुठे आहे? त्‍याची माहिती पारदर्शी पद्धतीने असायला हवी, याबाबत अद्याप पालिका प्रशासनाने लक्ष देण्‍याची गरज आहे, अशा सूचना करत मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आपण लवकरच ज्‍या ठिकाणी गाळ टाकला जातोय त्‍याही ठिकाणांची पाहणी करणार असल्‍याचे सांगितले.

वजन काट्यांचे नॉट रिचेबल
कंत्राटदाराने गाळ वजन करण्यासंदर्भात मिरा-भाईंदर येथील भारत वेथ ब्रिज आणि मिरा भाईंदर वेथ ब्रिज या दोन वजनकाट्यांनी नावे सांगितली. त्‍यानुसार कंत्राटदाराला दोन्ही वजन काट्यांनी फोन संपर्क करण्‍यास सांगितले मात्र संपर्क झाला नाही. तेव्हा गाळ वर्सोवा येथील चेन्‍ना गावाजवळील खासगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्‍यात येत असल्‍याचे कंत्राटदाराने सांगितले. त्‍यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सूचना त्‍यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी सोबत नगरसेविका अलका केरकर आणि एच पश्चिम विभागाचे शरद उघडे उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या