भाजपाला महापालिकेचा कारभार हवाय रात्रीही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रात्रीची दुकाने सुरु ठेवण्याच्या शिवसेनेच्या ‘नाईट लाईफ’च्या मागणीवरून जोरदार वादंग निर्माण झाल्यानंतर आता भाजपाने महापालिकेचा कारभार रात्रीही सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. महापालिकेची कार्यालये सकाळ ते सायंकाळ या कार्यालयीन वेळेतच सुरु असतात. ती रात्रीच्यावेळी सुरु ठेवल्यास मुंबईकरांना सेवा सुविधांचा लाभ घेता घेईलच शिवाय अनधिकृत फेरीवाले व बांधकामांवरही कारवाई करता येणार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

भाजपाला पटू लागलेय ‘नाईट लाईफ’चे महत्त्व -

शिवसेनेच्या ‘नाईट लाईफ’ला एकप्रकारे विरोध करणाऱ्या भाजपाला आता ‘नाईट लाईफ’चे महत्त्व पटू लागले आहे. भाजपाचे आमदार अमित साटम यांनी रात्री मार्केट सुरु ठेवण्याची मागणी केल्यानंतर भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिकेची कार्यालये रात्रीही सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. रात्रीही प्रशासनाचा जागता पहारा असला पाहिजे आणि नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेने सज्ज असले पाहिजे, असे सांगत गंगाधरे यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग व अग्निशमन दलाप्रमाणे अन्य विभागही 24 तास राहायला हवीत, अशी मागणी केली आहे.

पूर्णवेळ अनधिकृत कामांवर लक्ष ठेवता येईल -

मुंबईच्या रस्त्यांवर बसणारे फेरीवाले, अनधिकृत बांधकामे अशा अनेक कामांवर नियंत्रण ठेवणारा कर्मचारी वर्ग हा सकाळी ९ ते सायंकाळी ४ किंवा सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत काम करत असतो. कार्यालयीन वेळेपूर्वी किंवा नंतर अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण नसल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असतात.त्यावर उपाय म्हणून परवाना नियंत्रण, फेरीवाले, पाणी चोरी तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक यासारख्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा कार्यकाल संपूर्ण दिवसाकरता मर्यादित न ठेवता, त्याची विभागणी करून आवश्यकतेनुसार दोन किंवा तीन पाळ्यांमध्ये विभागण्यात यावा, असे प्रकाश गंगाधरे यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे.

एवढेच नव्हे, तर मुंबईतील कर्मचारी कार्यालय संपून संध्याकाळी उशीरा घरी परतत असल्यामुळे त्यांना महापालिकेच्या करांचा भरणा करणे शक्य व्हावे म्हणून कर भरणा करणारेही विभाग कार्यालयीन वेळेनंतरही सुरु ठेवण्यात यावे. जेणेकरून महसूल भरणे सुलभ होऊन महसुलातही भर पडेल आणि संबंधित कामांवरील नियंत्रण कालावधी वाढेल. परिणामी बेकायदा बाबींवरही कडक नियंत्रण ठेवणे महापालिकेला शक्य होईल, असे गंगाधरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यासाठी परवाना नियंत्रण, फेरीवाले, पाणी चोरी तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक आणि अशाप्रकारच्या आवश्यक खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळांचे पुनरावलोकन करून त्या तीन पाळ्यांमध्ये विभागण्यात यावे, अशी आपली मागणी असल्याचे प्रकाश गंगाधरे यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या