दादरकरांना घराजवळ करता येणार गाड्या पार्क

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादरमधील वाहन चालक-मालकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता आपल्या घराच्या परिसरातच गाडी पार्क करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेनं मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनानं दादरमधील २८ रस्त्यांवरील ३० पैकी १५ ठिकाणी रहिवाशांची वाहनं उभी करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं घराजवळ वाहन उभे करता येणार आहेत. मात्र, त्यासाठी रहिवाशांना त्यासाठी शुल्क भरावेच लागणार आहे. रहिवाशांच्या वाहनांसाठी लेबलं देण्यात येणार असून, या ठिकाणी लेबल नसलेलं वाहन उभे केलं गेल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईतील दादर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण होते. अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांचा फटका या वाहतुकीला बसत असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं. त्यामुळं प्रशासनानं दादरमधील २९ रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी या रस्त्यांवर 'नो पार्किंग'चे फलक लावण्यात आले. मात्र, महापालिकेच्या या निर्णयाला रहिवाशांकडून कडाडून विरोध झाला होता.

शिवसेना आणि दादरकरांच्या विरोधामुळे आता प्रशासनानं कोहिनूर स्क्वेअरमधील सार्वजनिक वाहनतळाच्या आसपासच्या ५०० मीटर क्षेत्रातील २८ पैकी १५ रस्त्यांवर एका बाजूला स्थानिक रहिवाशांची वाहनं उभी करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला 'नो पार्किंग' करण्यात आलं आहे. या रहिवाशांना परवानगी असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला चारचाकी आणि दुचाकी वाहन उभे करण्यासाठी दर महिन्याला अनुक्रमे १,०५० रुपये आणि ४४० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

वाहनधारक रहिवाशांना ६ महिन्यांचं किंवा एक वर्षांचं शुल्क भरावं लागणार आहे. रहिवाशांव्यतिरिक्त अन्य कुणालाही त्याठिकाणी आपलं वाहन उभे करता येणार नाही. रहिवाशांचे वाहन ओळखता यावे यासाठी त्यांना स्टिकर्स देण्यात येणार आहेत. स्टिकर लावलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहने तेथे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

बदललेले नियम

  • निवासी भागातील राम मारुती मार्ग, डी. एल. वैद्य मार्ग, गणेश पेठ लेन, आर. के. वैद्य मार्ग, छबिलदास रोड, अक्षिकर पथ, मनमाला टँक, पद्माबाई ठक्कर मार्ग, बाल गोविंद दास मार्ग, मनोरमा नगरकर मार्ग, एल. जे. रोड, एम. बी. राऊत मार्ग, केळुसकर रोड (दक्षिण), दादासाहेब रेगे मार्ग, गोखले रोड या रस्त्यांवरील १५ ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला नो पार्किंग आणि दुसऱ्या बाजूला रहिवाशांची वाहने सशुल्क उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • हरिश्चंद्र येवले मार्ग, जे. के. सावंत मार्ग, राऊत वाडी मार्ग, सुभाष खेमकर मार्ग, एस. बी. रोड सर्कल, न. चि. केळकर मार्ग, रानडे रोड, देऊबाई लेन, वाचनालय मार्ग, डिसिल्वा रोड येथील ११ ठिकाणी दुतर्फा वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • सेना भवन पथ, मनोहर राणे पथ, सखाराम कीर मार्ग, डी. व्ही. देशपांडे मार्ग नो पार्किंगमधून वगळण्यात आले आहेत.

'स्टिकर' बंधनकारक

वाहनतळ धोरणात केलेल्या फेरबदलांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात येणार आहे. रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी असली तरी सुरुवातीला तेथील सर्वच वाहने उचलण्यात येणार आहेत. रहिवाशांनी आपल्या वाहनासाठी रहिवासी असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर त्यांचे वाहन सोडण्यात येणार आहे. तसेच रहिवाशाने सहा महिन्यांचे अथवा वार्षिक शुल्क भरल्यानंतर स्टिकर देण्यात येणार आहे.


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या