हज यात्रेला निघालेल्या यात्रेकरुंना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

हज यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंना महापालिका आपत्कालिन प्रशिक्षण देत असून या प्रशिक्षणाचा लाभ ६४० प्रशिक्षणार्थींनी घेतला आहे. हे सर्व प्रशिक्षक त्यांच्या-त्यांच्या राज्यात किंवा क्षेत्रात जाऊन तेथील हज यात्रेकरुंना प्रशिक्षण देणार आहेत.

हज यात्रेला भारतातून दरवर्षी सुमारे १ लाख ७० हजार, तर जगभरातून सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू जात असतात. सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या सर्व यात्रेकरू आणि यात्रेसंबंधी विविध बाबींचं समन्वयन 'हज कमिटी ऑफ इंडिया' द्वारे केलं जात असते.

मुंबईतील 'हज हाऊस' येथे मुख्यालय असणाऱ्या या संस्थेद्वारे हज यात्रेकरुंना, हज यात्रेला जाण्यापूर्वी प्रशिक्षण देखील दिलं जातं. वर्ष २०१६ पासून या प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करण्यात आला. त्यानुसार गेल्या तीन वर्षात देशभरातून आलेल्या ३ हजार १५० प्रशिक्षकांना प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण मुंबई महापालिकेनं दिलं आहे.

महापालिकेच्या प्रशिक्षणाचा उपयोग

'हज कमिटी ऑफ इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसुद अहमद खान यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना याबाबत नुकतेच एक विशेष पत्र लिहून महापालिकेचे प्रशिक्षण उपयोगी ठरत असल्याचं आणि भविष्यात देखील महापालिकेचे असेच सहकार्य कायम ठेवावं, असं नमूद केलं होतं. तर, आपत्कालिन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण सुरू झाल्यापासून यात्रेकरुंना अधिक सतर्क राहून आपली हज यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यास मदत झाली आहे, असंही 'हज कमिटी ऑफ इंडिया'चे सल्लागार अकबर शेख यांनी आवर्जून म्हटलं आहे.

इतक्या प्रशिक्षकांना दिलं प्रशिक्षण

'हज' यात्रेकरुच्या प्रशिक्षकांना देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा हा आपत्कालिन व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी तयार केला आहे. हा आराखडा तयार करताना 'हज' यात्रेचा आणि 'हज' यात्रेकरूंकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा अभ्यास करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार गेल्या तीन वर्षात ३ हजार १५० हज प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. महापालिकेच्या वतीने हे प्रशिक्षण महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्यातील नियंत्रण कक्षाचे पर्यवेक्षक राजेंद्र लोखंडे यांनी दिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या