वडाळा आगार की डान्सबार? अभिनेत्री माधवी जुवेकरवर उडवले पैसे!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एकीकडे बेस्ट तोट्यात जात असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे बेस्टच्या वडाळा आगारातील कर्मचारी-अधिकारी पैशांची कशी उधळपट्टी करतात त्याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओत बेस्ट अधिकारी हे अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. या घटनेमुळे बेस्टची इज्जत चव्हाट्यावर आली आहे. आधीच बेस्ट उपक्रम तोट्यात आहेत, पगार उशिराने होत आहे, अशातच पैशांची केलेली उधळण आता चर्चेचा विषय ठरला आहे.

मेळाव्याचा व्हिडिओ व्हायरल

बेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यासह बेस्टचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या मेळाव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री माधवी जुवेकर ही डान्स करतेय आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर पैशाची उधळण करत आहेत. बेस्टची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार वेळेवर देण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत. कर्मचारी पगारासाठी आंदोलन आणि संप पुकारून मुंबईकरांना वेठीसी धरत आहेत. दुसरीकडे अभिनेत्रींवर पैशांची उधळण केली जात आहे.

महाव्यवस्थापकांनी घेतली गंभीर दखल

या प्रकाराची गंभीर दखल महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी जुवेकर यांच्यासह 11 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे. चौकशी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले. मात्र बेस्टची बदनामी टाळण्यासाठी या प्रकरणावर पांघरूण घातले जात असल्याचे समजते. दरम्यान बेस्ट आगाराचा डान्सबार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे.

'त्या' प्लास्टिकच्या नोटा

खरंतर हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम होता. व्हिडिओमध्ये ज्या नोटा दिसत आहेत, त्या 'चिल्ड्रन मनी बँक'च्या प्लास्टिकच्या खोट्या नोटा आहेत. मी आयुष्यात कधीही खऱ्या नोटांवर नाचलेले नाही. बेस्टची प्रतिमा खराब होईल, असं कुठलंही काम मी केलेलं नाही आणि करणारही नाही. या कार्यक्रमात आम्ही वेगवेगळ्या प्रकारे डान्स करत होतो. आम्ही करत असलेल्या डान्सला 'कच्ची डान्स' असं म्हणतात. सोबतच आम्ही गरबा, जोगवा आणि मंगळगौर असे डान्सही केले. कच्ची डान्स प्रकारात कपाळावर पैसे ठेऊन नाचलं जातं. एखाद्याच्या तोंडातील नोट दुसरा माणूस उचलतो; पण त्यासाठी आम्ही खोट्या नोटा वापरल्या. हा कच्ची डान्स गणेशोत्सव, दहीहंडी यावेळी केला जातो. हा डान्स बारमधला डान्स नाही. केवळ माझी बदनामी करण्यासाठी महिन्याभरानंतर हा प्रकार बाहेर आला. संपूर्ण बेस्ट प्रशासन माझ्या पाठीशी आहे.

- माधवी जुवेकर, अभिनेत्री, बेस्ट कर्मचारी

पुढील बातमी
इतर बातम्या