BMC Budget 2022: मुंबईची 'तुंबई' थांबविण्यासाठी ५६५.३६ कोटींची तरतूद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस पडल्यास मुंबईची तुंबई होते. पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नाल्यांची सफाई केली जाते. मात्र तरीही मुसळधार पावसात मुंबईकरांना गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून वाच काढावी लागते. शिवाय रेल्वे व रस्ते वाहतुकही विस्कळीत होते. त्यामुळं महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. परंतू, आता महापालिकेनं यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच या तयारीचा आढावा यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तब्बल ४६ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७ हजार कोटीनी हा आकडा मोठा असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईची तुंबई होण्यापासून टाळण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या काही कामांची यादी यंदाच्या अर्थसंकल्पात देखील समाविष्ट करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून ५६५.३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईत पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

पोर्टेबल उदंचन संच

सखल भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ३०५ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे पोर्टेबल उदंचन संच लावण्यात आले. तसेच, सन २०२१ मध्ये पावसाळ्यात जम्बो कोविड सेंटर, रेल्वे कल्व्हर्ट आणि इतर सखल भागात १३४ अतिरिक्त उदंचन संच लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक जाळया

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील संवेदनशील असलेल्या ५६ ठिकाणांजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर प्रतिबंधात्मक जाळया बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

पूरप्रतिबंधक दरवाजे

मिठी नदी आणि वाकोला नदीमधून समुद्राच्या भरतीमुळे व पावसाच्या पाण्यामुळे होणारी पूरसदृश्य स्थिती टाळण्याकरिता कलानगर परिसरात एकूण ६ ठिकाणी ११ पूरप्रतिबंधक दरवाजे तसेच पाण्याचा उपसा करणाऱ्या १९ सबमर्सिबल उदंचन संचांची उभारणी करण्यात आली आहे.

३००० घन मी / प्रतितास क्षमतेचे १५ उदंचन संच आणि गांधी मार्केट व त्याच्या खालील बाजूला साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्याकरीता हिंदमाता येथे बाजुला १८००० घन मी / प्रतितास क्षमतेचे पंप उर्ध्ववाहिनी व्यवस्थेसह आणि पूरप्रतिबंधक दरवाजांसह स्थापित करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या