नाताळ, नववर्ष पार्ट्यांवर महापालिका ठेवणार नजर; ४८ पथके तैनात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

येत्या काही दिवसांत २०२१ हे वर्ष संपणार आहे. या वर्षाची सांगता व नव वर्षाचं स्वागत थर्टी फर्स्ट पार्टीच्या आयोजनानं केली जाते. यासाठी सर्वजण एकत्र येऊन नाच, गाणी, खेळ खेळत नव वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात. यंदाही अशाच प्रकारच्या पार्ट्यांसाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतू, सध्या मुंबईत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनच्या सावटामुळं महापालिकेनं सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. शिवाय गर्दी न होता कोणत्याही नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी ४८ पथके तैनात केली आहेत.

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला, तरीही काही पार्ट्यांमध्ये नियमभंग झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेनं अधिक सुरक्षितता आणि काटेकोर नियम लागू करण्याचं ठरविलं आहे. त्यासाठी, नाताळ, नववर्ष पार्ट्यांवर अधिक करडी नजर ठेवण्यात येणार असून, नियमांचं पालन होत नसल्यास कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी महापालिकेनं प्रत्येक प्रभागात २ यानुसार ४८ पथकं तैनात केली आहेत.

राज्य सरकार, महापालिकेनं मुंबईत कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना हॉटेल्स, बंदिस्त सभागृहात ५० टक्के उपस्थितीचा नियम लागू केला आहे. तसंच मोकळ्या मैदानात त्यासाठी २५ टक्क्यांची मर्यादा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीतील नियमभंग प्रकरणानंतर पालिकेने अधिक सतर्क राहण्याचे ठरविले आहे.

यासंदर्भात, राज्य सरकारकडून नवीन नियमावली तयार केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी, पालिकेने मुंबईत नोव्हेंबरमध्ये लागू केलेल्या नियमानुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाणे बंधनकारक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने पार्ट्या, कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात २ यानुसार ४८ पथके तयार केली आहेत. गरज वाटल्यास त्यांची संख्या वाढविली जाणार असल्याचं समजतं. तसंच, हॉटेल्स, सभागृहांना कार्यक्रमांविषयी नियमांबाबत पुन्हा माहिती देण्यात आलेली आहे. त्याउपरही नियम पाळले न गेल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या