दादरमध्ये फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई मोहिमेअंर्तगत दादरमध्ये पहिल्यांदा एका फेरीवाल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री रमेशकुमार वैश्य नावाचा फेरीवाला धंदा करताना आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वाहन निरीक्षक एक दिवसाकरता निलंबित

दादरमध्ये रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात एकाही फेरीवाल्यांना बसू देणार नाही असा इशारा मनसेने दिल्यानंतर कडक कारवाई केली जात आहे. या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे. तरीही याठिकाणी फेरीवाले बसत असल्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे मंगळवारी महापलिकेेच्या वाहन निरीक्षकाला एक दिवसाकरता निलंबित करण्यात आले होते.

फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल

फेरीवाल्यांमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे अखेर अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांची गय करायची नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे बुधवारी रात्री केशवसुत उड्डाणपुलाच्या गाळ्यात धंदा करणाऱ्या फेरीवाल्याला पकडून त्याच्याविरोधात कडक कारवाई केली.

बुधवारी रात्री 10 वाजता दादर (पश्चिम) रेल्वे स्टेशन बाहेर कवी केशवसुत उड्डाणपुलाखाली रमेश वैश्य हा भाजीविक्रीचा धंदा करत होता. त्यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याला मनाई केली. पण त्यावेळी त्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि जीवे मारण्याची धमकी या कलमाखाली त्याच्याविरोधत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईत प्रथमच असा गुन्हा एका फेरीवाऱ्याविरोधात नोंदवण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या