धारावी ते भांडुप टनेल प्रकल्पाला CRZ मंजुरी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसाठी मोठा पायाभूत टप्पा पूर्ण झाला आहे. बीएमसीच्या प्रस्तावित बोगद्याला कोस्टल रेग्युलेटरी झोनची (CRZ) मंजुरी मिळाली आहे. हा बोगदा धारावी सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधून शुद्ध केलेले पाणी घाटकोपरमार्गे भांडुप वॉटर फिल्टरेशन प्लांटपर्यंत नेणारा आहे. 

या मंजुरीनंतर अंदाजे 3,000 कोटींच्या या प्रकल्पाला पुढे जाण्याची परवानगी मिळाली आहे. शहरातील सांडपाणी पुनर्वापर धोरणातील हा एक महत्त्वाचा घटक मानला जात आहे.

हा उपक्रम मुंबईतील सात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या 27,309 कोटींच्या आधुनिकिकरणाचा एक भाग आहे. या योजनेखाली एकूण 2,464 MLD सांडपाणी शुद्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

तेवढ्याच प्रमाणात सेकंडरी आणि टर्शियरी ट्रीटमेंट केले जाणार आहे. शुद्ध केलेले पाणी 8.48 किमी लांबीच्या बोगद्यातून, 145 ते 150 मीटर खोलीवर, आणि घाटकोपरच्या ठिकाणी 152 मीटर पर्यंतच्या कमाल खोलीवर नेले जाणार आहे. या बोगद्याची 416 MLD वाहत क्षमता निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे भांडुप संकुलापर्यंत पुरेसे पाणी पोहोचवता येईल.

अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की, भविष्यात हे शुद्ध केलेले पाणी पिण्याच्या पाण्यासाठीही वापरण्याचा विचार केला जाऊ शकतो. यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुंबईसाठी अतिरिक्त पुरवठा स्रोत उपलब्ध होईल.

“भविष्यातील पाण्याच्या मागणीसाठीही या शुद्ध पाण्याचा उपयोग होऊ शकतो,” असे अंतर्गत निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. घाटकोपर–भांडुप लिंकला सप्टेंबर 2024 मध्येच प्राथमिक मंजुरी मिळाली होती. आता अंतिम CRZ मंजुरी मिळाल्याने बांधकामासाठी आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण झाल्या आहेत.

या प्रकल्पाची पार्श्वभूमी म्हणजे मुंबईची कायमस्वरूपी पाणीटंचाई. सध्या शहरात दररोज 3,850–4,000 MLD पाणी पुरवठा केला जातो. परंतु मागणी 4,500 MLD आहे.

वरळी, बांद्रा, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वर्सोवा येथील सात STP मिळून 2,464 MLD पाणी प्रक्रिया करतात. याशिवाय, शहरातील जवळपास 34% नॉन-रेव्हेन्यू वॉटर जवळपास 1,343 MLD गळती, पाणी चोरी आणि बेकायदेशीर जोडण्यांमुळे वाया जात असल्याचे सांगितले जाते.

या परिस्थितीत, औद्योगिक किंवा इतर पिण्यायोग्य नसलेल्या वापरासाठी का होईना, शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर हा अत्यावश्यक घटक ठरत आहे. नव्याने मंजूर झालेला हा बोगदा भविष्यातील मुंबईच्या पाणीव्यवस्थापनात लवचिकता आणि शाश्वतता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


हेही वाचा

जिजामाता उद्यानात 10 एकरात ‘एक्झॉटिक झोन’

विरारला प्लॅटफॉर्म रुंदीकरणामुळे लोकल सेवांमध्ये बदल

पुढील बातमी
इतर बातम्या