आधी विकासकांच्या घरचं वीज, पाणी कापा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मोठ्याप्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या निवासी तसेच व्यावसायिकांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. तरीही अनेक संकुलांकडून याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या संकुलांची वीज आणि पाणी कापण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. याचा समाचार बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

'उल्लंघन करणाऱ्या विकासकांची घरेच तोडा'

जर वीज, पाणी कापायचे असेल तर एफआयआयचा लाभ घेत त्याचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांची घरेच तोडा. त्या विकासकांच्या अन्य प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या आयओडी, सीसी रोखा, अशी संपप्त प्रतिक्रीया सदस्यांनी व्यक्त केली.

मुंबईत निर्माण होणाऱ्या सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सात परिमंडळांमध्ये खासगी टेम्पोची सेवा घेण्याच्या कंत्राटाचे प्रस्ताव मंजुरीला आले असता भाजपाचे मनोज कोटक यांनी सर्व मोठ्या गृहनिर्माण संस्थांना महापालिका भीती दाखवत आहे. ज्या गृहनिर्माण संस्था ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार नाही अशा २००७ नंतरच्या आयओडी दिलेल्या संकुलांचे वीज, पाणी तोडण्याची धमकी दिली जात आहे. परंतु या इमारती काही लोकांनी बांधलेल्या नाहीत. ज्या विकासकांनी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा राखीव ठेवण्याचा लाभ एफएसआयद्वारे घेतला आहे, त्या विकासकांना सोडून लोकांवर कसली कारवाई करता? हिंमत असेल विकासकाच्या घरचे वीज, पाणी तोडून दाखवा, त्यांच्या प्रकल्पांची आयओडी, सीसी प्रमाणपत्र रोखून दाखवा, असे आव्हान कोटक यांनी प्रशासनाला केले.

'दत्तक वस्ती पुन्हा सुरू करा'

शिवसेनेचे आशिष चेंबुरकर यांनी पोलीस, महापालिका तसेच रेल्वे आदी वसाहतींबाबत महापालिकेची भूमिका काय आहे, अशी विचारणा केली. कारण यासर्व वसाहती मोठ्या आहेत. तसेच शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी दत्तक वस्ती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे दत्तकवस्तीच्या धर्तीवर रावबल्यास चांगल्याप्रकारे लाभ मिळू शकतो, असे सांगत कचरा पेट्यामुक्त मुंबई दिसत असली तरी शाळा, कॉलेजबाहेर कचऱ्याचा ढिग दिसून येत असल्याचे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी २००७ नंतर ज्या संकुलांच्या बांधकामांना आयओडी दिली होती, त्यांना ओल्या कचऱ्यांची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यांनी एफएसआयचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या संकुलांनी ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात कोणतेही पाऊल न उचलल्यास त्याविरोधात कडक पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या