'निर्माल्य द्या, खत घ्या', महापालिकेचा अनोखा उपक्रम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

हार, फुलांच्या निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम महापालिका अनेक वर्षांपासून राबवत आहे. यंदा भाविकांकडून निर्माल्य घेऊन त्याबदल्यात त्यांना जागेवरच खत देण्याचा स्तुत्य उपक्रम महापालिकेच्या के/पूर्व कार्यालयाने गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हाती घेतला आहे. जोगेश्वरी आणि विलेपार्ले तलावात गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना हे खत वाटण्यात येत आहे.

महापालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयाने जोगेश्वरी शामनगर तलाव आणि विलेपार्लेतील हेगडेवार मैदानात भाविकांकडून निर्माल्य घेण्यास सुरूवात केली. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनापासून ते सात दिवसापर्यंतच्या गणपती विसर्जनापर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांनी भाविकांकडून निर्माल्य जमा केले.

दोन्ही ठिकाणी निर्माल्यापासून खत बनविण्याचे मशिन बसवण्यात आले असून गेल्या दहा दिवसांमध्ये निर्माल्यावर प्रक्रिया करून येथे मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर हे खत पाकिटबंद करून भाविकांना वाटण्यात येत असल्याची माहिती के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.

शामनगर तलाव व हेगडेवार मैदान या ठिकाणी ५०० किलो वजनाच्या निर्माल्यावर प्रक्रिया करणाऱ्या दोन मशिन बसवण्यात आल्या आहेत. त्यापासून बनवण्यात येणारे खत पाकिटात टाकून दोन्ही ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना दिले जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे भाविक निर्माल्य देतील, त्यांनाच खताचे पाकिट देण्यात येत आहे. गणरायाच्या चरणी वाहिलेले निर्माल्य सेंद्रीय खताच्या रुपात परत देण्यात येत आहे, असा संदेशच या खताच्या पाकिटांवर देण्यात आला आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या