दर्जा नुसता नावालाच, २ आठवड्यांत गळू लागला कुर्ल्यातील भुयारी मार्ग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

तब्बल १४ वर्षे रखडलेल्या कुर्ला पूर्व-पश्चिम भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा २६ ऑक्टोबरला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाला. पण याच भुयारी मार्गाला अवघ्या महिन्याभराच्या आत गळती लागल्याचं दिसत आहे.

कुर्ला पूर्व-पश्चिम हा भुयारी मार्ग कुर्ला रेल्वे स्थानकातील तब्बल १० रेल्वे रुळांखालून जातो. तसेच हा मुंबईतील सर्वात मोठा भुयारी मार्ग असल्याचंही महापालिकेने सांगितलं होतं. पण, महापालिकाने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भुयारी मार्गाची २ आठवड्यांतच दयनीय अवस्था झाली आहे.

कशी आहे नेमकी अवस्था?

दोन आठवड्यातच भुयारी मार्गाच्या छताचे पापुद्रे निघाले आहेत. त्यातून पाण्याची गळती सुरू आहे. सोबत वाहून जाणारं सांडपाणी आणि त्याने वाढलेलं डासांचं प्रमाण यामुळे या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. भरीस भर म्हणजे पान खाणाऱ्यांनी तिथल्या भिंती रंगवून जणू महापालिकेच्या कारभाराला प्रशस्तिपत्रकच दिलं आहे.

एखादं काम पूर्ण झालं की सर्व राजकीय पक्ष त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु फसलेल्या कामाची जबाबदारी घ्यायला कुणीही समोर येत नाही.

- सदाशिव मोरे, नागरिक

या भुयारी मार्गाची नागरिकांना फार गरज आहे. पण तरीही अशा प्रकारची दशा इतक्या लवकर होणं ही चिंतेची बाब आहे. यामुळे प्रशासनाच्या एकूण कारभारावर प्रश्न निर्माण होतात.

- सविता महाडीक, प्रवासी

हा भुयारी मार्ग पालिकेच्या अखत्यारीत येत असला तरी गळतीचं काम करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. तिथे स्वच्छतेसाठी महापालिका लवकरच कंत्राटदार देणार आहे आणि सुरक्षेसाठी तिथे सीसीटीव्ही देखील लावण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या